MPSC Paper leak : नंदुरबारमध्ये एकाच कॉलनीत राहणाऱ्या ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्यात स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासादरम्यान ओळख झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. गौरवने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास गांभीर्याने घेणे सोडले, तर ऋतुजाला फार्मास्युटिकल कंपनीत नोकरी मिळाली. मात्र, सरकारी अधिकारी होण्याचे तिच्या वडिलांचे आणि तिचे स्वप्न कायम राहिले. त्यासाठी एका क्लासेसशी संबंधित व्यक्तीच्या माध्यमातून परीक्षा पास होण्यासाठी सेटिंग लावण्यात आल्याची माहिती आहे. 22 मार्च 2026 रोजी होणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेपूर्वी पेपर मिळवण्यासाठी पाच लाख रुपये अॅडव्हान्स देण्यात आल्याचे सांगण्यात आले. ऋतुजाला प्रश्नपत्रिका मिळणार असल्याचे आधीच सांगण्यात आले होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : प्रेमसंबंधाच्या वादातून महसूल सहाय्यक असलेल्या तरुणीवर कोयत्याचे 8 वार, 2 महिन्यांनी मृत्यू
दोघांचे ब्रेकअप झाले अन् पुढे काय घडलं?
20 मार्च रोजी ऋतुजाला एका अॅपवर प्रश्नपत्रिका पाठवण्यात आली. ती डाउनलोड न करता तिने बॅकअप म्हणून प्रश्नपत्रिका तिच्या बॉयफ्रेंडला म्हणजे गौरवला फॉरवर्ड केली. 22 मार्च रोजी परीक्षा झाल्यानंतर दुपारी 12 वाजून 28 मिनिटांनी ऋतुजाने पेपर देणाऱ्या व्यक्तीशी फोनवर संपर्क साधला. परीक्षेत 100 पैकी 90 प्रश्न पर्यायांसह तंतोतंत आले असून त्यापैकी 78 प्रश्न आपण सोडवल्याचे तिने सांगितल्याची माहिती आहे. उर्वरित प्रश्न तिने अंदाजाने सोडवल्याचेही सांगण्यात आले. मात्र, यानंतर ऋतुजा आणि गौरव यांच्यात वाद सुरू झाले. पुढे दोघांचे ब्रेकअप झाले. ऋतुजा अधिकारी होणार असल्याने घरच्यांकडून लग्नासाठी वेगळी स्थळे पाहिली जातील, अशी चर्चा त्यांच्यात होत असल्यानेही दोघांमध्ये मतभेद वाढल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा : NEET विद्यार्थिनीने संपवलं जीवन, लहान बहिणीने दरवाजा उघडताच बसला धक्का
गांगुर्डे नावाच्या परीक्षार्थीचा व्हिडीओ व्हायरल झाला अन् बॉयफ्रेंडला समजलं..
याच काळात गांगुर्डे नावाच्या परीक्षार्थीने परीक्षेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करणारा सोशल मीडिया व्हिडीओ केला. त्यात गुणवत्ता यादी लावली असेल तर उमेदवारांचे गुण का जाहीर केले नाहीत आणि कोणत्या आधारावर मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड झाली, असा सवाल करण्यात आला. हा व्हिडीओ गौरवच्या निदर्शनास आला आणि त्याने गांगुर्डेशी संपर्क साधला. त्यानंतर दोघांनी तक्रार करण्याचा निर्णय घेतला. गौरवकडे ऋतुजाला मिळालेली प्रश्नपत्रिका, दोघांमधील चॅट्स आणि इतर स्क्रीनशॉट असल्याची माहिती गांगुर्डेला देण्यात आली. दरम्यान, तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्याचे सांगत आयोगाने पत्रकार परिषदेत पेपरफुटीचे आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, गांगुर्डेने पुन्हा या प्रकरणातील कागदपत्रे आणि पुरावे समोर आणले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आणि मुंबई क्राईम ब्रांचने तपास सुरू केला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काढलेल्या परिपत्रकानुसार, 22 मार्च 2026 रोजी झालेल्या औषध निरीक्षक गट-ब, अन्न व औषध प्रशासन या संवर्गाच्या परीक्षेबाबत 22 मार्च ते 26 जुलैदरम्यान उमेदवार आणि लोकप्रतिनिधींकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मुंबई क्राईम ब्रांचच्या प्राथमिक चौकशी अहवालानुसार एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याला त्याचा लाभ झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे परीक्षेची गोपनीयता, अखंडता, पारदर्शकता आणि निष्पक्षता तसेच उमेदवारांचा आयोगावरील विश्वास लक्षात घेऊन ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला. या निर्णयामुळे निवड झालेल्या उमेदवारांनाही पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.
ADVERTISEMENT












