Nagpur Crime News : नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनीषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री धक्कादायक घटना घडली. अनैतिक संबंधातून एका विवाहित प्रियकराने आपल्या प्रेयसीची हॉटेलच्या खोलीत हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत शिवानी राजनंद गजभिए (28) हिचा मृत्यू झाला असून आरोपी किरण कुमार संजय आग्राम (40) याच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. दोघेही रेल्वेत एकत्र नोकरी करत होते.
ADVERTISEMENT
डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला अन् दोघेही रक्ताच्या थारोळ्यात..
मंगळवारी दुपारी सुमारे 2 वाजता दोघांनी हॉटेल स्टेरियसच्या कमरा क्रमांक 302 मध्ये चेक-इन केले. त्यानंतर दोघेही खोलीबाहेर आले नाहीत. मंगळवारी सायंकाळी सुमारे 7 वाजता किरणने आपल्या मित्रांना फोन केला. आजचा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगत त्याने मित्रांना शेवटच्या भेटीसाठी हॉटेलमध्ये बोलावले. त्याच्या बोलण्यावरून मित्रांना संशय आला. रात्री सुमारे 9 वाजता मित्र हॉटेलमध्ये पोहोचले. खोली आतून बंद होती. आवाज दिल्यानंतरही कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. त्यानंतर मित्रांनी हॉटेल व्यवस्थापनाला माहिती दिली. डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र आतून चिटकणी लावलेली होती. दरवाजा उघडल्यानंतर दोघेही रक्ताच्या थारोळ्यात आढळले.
शिवानीच्या मानेवर वार करुन संपवलं, अन् किरणचाही आत्महत्येचा प्रयत्न
शिवानीच्या मानेवर वार केल्याच्या खुणा होत्या आणि ती मृतावस्थेत होती. तर किरणच्या गळ्यावर चाकूचा वार झालेला होता तसेच त्याच्या शरीरावरही चाकूने वार केल्याच्या खुणा होत्या. शिवानीचे वडील राजनंद आणि किरण कुमार हे बल्लारशाह येथे एकत्र नोकरी करत होते. त्यामुळे किरणचे शिवानीच्या घरी येणे-जाणे होते. त्यानंतर किरणची नागपुरात बदली झाली. किरण शिवानीच्या जवळ जात असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी या संबंधाला विरोध केला होता. सुमारे तीन वर्षांपूर्वी शिवानीचे लग्नही करण्यात आले होते. वडिलांच्या निधनानंतर शिवानीला रेल्वेत नोकरी मिळाली आणि त्यानंतर दोघांचे संबंध आणखी घट्ट झाल्याचे सांगितले जाते.
घटनेपूर्वी किरणने हॉटेलमधील खोली सजवली होती. त्याने गुलाबाची फुले ठेवून ‘विल यू मॅरी मी’ असा सरप्राइजही आयोजित केला होता. खोलीत नवीन साडीही ठेवण्यात आली होती. त्यामुळे दोघेही लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे. मात्र खोलीच्या आत नेमके काय घडले आणि ही घटना रक्तरंजित हत्येत कशी बदलली, याचा तपास सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शिवानीच्या हातात चाकू आढळल्याने तिने किरणवर चाकूने हल्ला केला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर किरणने शिवानीच्या मानेवर वार केल्याचा संशय आहे. किरणची चौकशी झाल्यानंतरच या घटनेमागील वास्तविक कारण समोर येईल. उशिरापर्यंत किरणवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT












