नांदेड : नांदेडमध्ये काल शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. शहरालगतच्या खुपसरवाडी येथील मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं गुरूवारी (15 मे 2025) आत्महत्या केली. पुनीत विनोदराव वाटेकर या विद्यार्थ्यानं असाइनमेंटच्या दबावामुळे मानसिक तणावात येऊन टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. नांदेड़ शहरातील धनगरवाडी येथे किरायाने राहणाऱ्या पुनीतच्या आत्महत्येनंतर कॉलेज प्रशासन आणि शिक्षकांवर गंभीर आरोप केले जातायत. वजीराबाद पोलीस ठाण्यात शिक्षक आणि कॉलेज प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जातेय. तर एक दिवस आधीच बुधवारी दहावीत 73 टक्के पडल्यामुळे एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे. या दोन्ही घटनांमुळे नांदेड हादरलंय.
ADVERTISEMENT
असाइनमेंटसाठी मानसिक छळ केल्याचा आरोप
पुनीत हा मूळचा अमरावती जिल्ह्यातील शिरसोली येथील रहिवासी होता. त्याची बहीण श्वेता वाटेकर देखील याच कॉलेजमध्ये नर्सिंगचं शिक्षण घेत होता. सध्या कॉलेजमध्ये परीक्षेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असून, विद्यार्थ्यांवर असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी कॉलेज कर्मचाऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. परीक्षेची तयारी आणि असाइनमेंट यामुळे विद्यार्थी द्विधा मन:स्थितीत होते. विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांकडे असाइनमेंटसाठी मुदतवाढ मागितली होती. मात्र, त्यांनी ही विनंती फेटाळली. याशिवाय, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसोबत अपमानास्पद वागणूक दिली जात असून, शिक्षकाकडून मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
पुनीतला न्याय द्या, विद्यार्थी आक्रमक
हे ही वाचा >>आधी मुलीला संपवलं, नंतर पत्नीला आणि मग स्वत:... बापानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं?
पुनीतची बहीण श्वेता आणि त्याच्या आईनेही गंभीर आरोप केले आहेत. असाइनमेंटच्या अतिरिक्त दबावामुळे पुनीतवर मानसिक तणाव वाढला आणि त्यानं आत्महत्या केल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी त्यांनी वजीराबाद पोलिस ठाण्यात शिक्षक आणि कॉलेज प्रशासनाविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. पुनीतला न्याय मिळावा यासाठी शेकडो विद्यार्थ्यांनी ग्रामीण पोलीस ठाणे आणि वजीराबाद पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केलं. यानंतर त्यांनी नांदेड़ शहर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात आपली कैफियत मांडली. तिथंही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.
हे ही वाचा >>"अमित शाह घामाघूम होऊन मातोश्रीच्या दारात..." बाळासाहेबांच्या एका फोनमुळे ते वाचले, राऊतांच्या पुस्तकात गौप्यस्फोट!
दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या प्रकरणात दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्याचं आश्वासन दिलं. त्यांनी कॉलेज प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलावून विद्यार्थ्यांचं मत जाणून घेण्याचं स्पष्ट केलं. या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. सध्या वजीराबाद पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
या घटनेच्या एक दिवस आधीच नांदेडच्या अंबानगर येथील रहिवासी रोशनी पगारे या विद्यार्थिनीनेही आत्महत्या केली. दहावीत कमी गुण मिळाल्यानं निराश होऊन तिने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (14 मे 2025) दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली.
दरम्यान, या घटनेने नांदेड़मधील शैक्षणिक वातावरणात खळबळ उडाली असून, कॉलेज प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT
