Crime News : नवी दिल्लीतील लोधी कॉलनी परिसरात एका 28 वर्षीय नवविवाहितेचा इमारतीच्या छतावरून पडून संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आकृती सुतार असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 24 एप्रिल रोजी आकृतीचे लग्न झाले होते. लग्नाला तीन महिनेही पूर्ण झाले नसताना घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. आकृतीच्या माहेरच्या लोकांनी हा अपघात किंवा आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे आणि सासरच्या मंडळींवर हत्येचा थेट आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
आधी कुटुंबियांशी बोलली अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (4 जुलै) उशिरा संध्याकाळी लोधी कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीवरून महिला पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या आकृतीला एम्स (AIIMS) ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले, मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आकृती दिल्लीतील छतरपूर भागात एका खाजगी कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत होती. घटनेच्या दिवशीही ती नेहमीप्रमाणे कामावर गेली होती आणि संध्याकाळी तिचे तिच्या कुटुंबीयांशी फोनवर बोलणेही झाले होते.
हे ही वाचा : पुण्याच्या तळेगाव दाभाडे परिसरात रस्ता फोडून उसळला पाण्याचा फवारा, Video व्हायरल
इमारतीवरुन पडून मृत्यू
फोनवर बोलताना आकृतीने ती ऑफिसमधून निघाली असून घराकडे जात असल्याचे सांगितले होते, मात्र काही वेळातच तिचा फोन नॉट रीचेबल येऊ लागला. संपर्क होत नसल्याने काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. याच दरम्यान त्यांना लोधी कॉलनी पोलिसांकडून आकृतीचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक माहिती मिळाली. रुग्णालयात पोहोचल्यानंतर आकृतीच्या माहेरच्यांनी सासरच्यांवर गंभीर आरोप केले. आकृती मानसिकदृष्ट्या अत्यंत खंबीर होती आणि ती आत्महत्येसारखे पाऊल कधीच उचलू शकत नाही, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी तिच्या वडिलांनी व नातेवाईकांनी केली आहे. आकृतीचा विवाह पुष्प विहार येथील सरकारी निवासस्थानात राहणाऱ्या कामगार विभागातील एका सेक्शन ऑफिसरच्या मुलाशी झाला होता.
हे ही वाचा : 30 वर्षीय बहिणीवर दोन भावांकडून सामूहिक बलात्कार, धक्कादायक कारण समोर
पोलिसांनी काय सांगितले?
दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, 4 जुलै रोजी पालिका कुंज येथे आकृती जखमी अवस्थेत आढळली होती. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम 196 अनुसार कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या मते, सध्या या घटनेच्या सर्व बाजूंची बारकाईने चौकशी केली जात आहे. शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आणि इतर तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही शक्यता नाकारता येणार नाहीत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT












