Crime News : ओडिशामधील बलांगीर जिल्ह्यातील चित्रामुंडा गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्याच वहिनीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. जानकी साहू उर्फ रंजू असे मृत महिलेचे नाव असून, भोजराज साहू नावाच्या आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलले. जानकीचा पती कामानिमित्त परराज्यात राहत असल्याने ती गावात एकटीच होती, ज्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न आरोपीने केला. ही घटना 2 मे रोजी घडली होती, मात्र दोन दिवसांनंतर मृतदेह सापडल्याने या प्रकरणाचा खुलासा झाला.
ADVERTISEMENT
वहिणीने भावजीला दिला नकार
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भोजराज हा मृत महिलेचा नात्याने दीर लागत होता. त्याचे आपल्या वहिनीवर एकतर्फी प्रेम होते आणि तो तिच्यावर सतत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असे. जानकीने त्याच्या या प्रस्तावांना वारंवार ठामपणे नकार दिला होता, ज्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत असत. घटनेच्या रात्री याच वादाचे रूपांतर संघर्षात झाले आणि संतापलेल्या दीराने जानकीवर दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला, त्यानंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा : नागपूर : नायब तहसीलदारांना चालत्या जेसीबीला लटकवून 4 किलोमीटरपर्यंत नेले, मुरुम माफीयांची दहशत
219 वेळा कॉल
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना तांत्रिक पुराव्यांचा आधार घेतला. तपासात असे समोर आले की, गेल्या दोन महिन्यांत आरोपीने मृत महिलेला तब्बल 219 वेळा फोन केले होते. कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) आणि इतर पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले की, वारंवार केलेले प्रेमाचे निवेदन धुडकावून लावल्याने त्याने हत्येचा कट रचला होता. पोलिसांनी आरोपी भोजराजला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. मंगळवारी सकाळी पोलिसांनी घटनास्थळी आरोपीला नेऊन गुन्ह्याचे 'सीन रिक्रिएशन' देखील केले.
हे ही वाचा : विहिरीतून धूर का येतोय? डोकावून पाहिल्यावर हादरुनच गेला..'तो' मृतदेह कोणाचा?
दोन मोबाईल फोन जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचा भाऊ ब्रह्मराज साहू याच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला होता. एसडीपीओ लक्ष्मीनारायण मरांडी यांनी सांगितले की, हत्येसाठी वापरलेला दगड आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. सध्या या प्रकरणात एकाच व्यक्तीचा सहभाग असल्याचे दिसत असले, तरी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, आरोपीला लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे. वैयक्तिक संबंधांतील तणाव आणि विकृत मानसिकतेतून हा भयानक गुन्हा घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT











