लातूरः लातूरचा एक तरुण. मुंबईत फ्लॅट घेतला. ५७ लाखांचं कर्ज. हफ्ते थकायला लागले, हे कर्ज फेडण्यासाठी त्याच्या डोक्यात अचानक एक आयडिया येते. तो एका व्यक्तीला लिफ्ट देतो आणि गाडीसह त्या माणसाला जाळून टाकतो. मग खरा प्लॅन सुरु होतो. हा प्लॅन असतो टर्म इंशोरन्सचे एक कोटी रुपये मिळवण्याचा. मात्र एक चूक होते, पोलिसांना संशय येतो आणि २४ तासातच या पठ्ट्याचा करेक्ट कार्यक्रम होतो. लातूरमधील ही घटनाय. ५० वर्षीय व्यक्तीचा मर्डर झालाय आणि जो तरुण दिसतोय तो आरोपी आहे. त्याचं नाव आहे गणेश चव्हाण. तर हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे गोविंद यादव. ही स्टोरी फारच रंजक आहे, म्हणजे एखाद्या सिनेमासारखी. ही ए टू झेड स्टोरी आपण जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
लातूर मर्डरची संपूर्ण कहाणी
घटना काय घडली आणि कशी समोर आली ते बघा. 14 डिसेंबरच्या रात्री साडेबाराला 112 हेल्पलाईनवर एक कॉल येतो. वानवडा पाटी ते वानवडा जाणारे रोडवर एका गाडीला आग लागल्याची माहिती मिळते. पोलिस आणि अग्निशमन दल तिथं पोहोचतात. आग विझवतात, गाडीमध्ये एक मानवी हाडाचा सांगाडा अर्धवट जळालेल्या स्थितीत दिसून येतो. तपास सुरु होतो. सांगाडयाचा पोस्टमार्टम जागीच वैदयकिय अधिकारी बोलावुन डी.एन.ए. सॅम्पल काढून ठेवले जातात. गाडी नंबरवरुन मालकाचा शोध घेतला जातो. ही गाडी बळीराम राठोड यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न होतं. ही गाडी त्यांचा मेव्हणा गणेश चव्हाण हा वापरत असल्याची माहिती समोर येते. मग गणेशचा शोध पोलिस घेतात. रात्री दहाच्या सुमारास मित्राला लॅपटॉप देण्याचे कारणाने बाहेर गेला असल्याचं त्याची पत्नी सांगते.
मग रडारड सुरु होते. घटनास्थळावर जळालेल्या गाडीतुन प्राप्त झालेल्या हातातल्या कड्यावरुन सदरचा मयत हाडाचा सांगाडा हा गणेश चव्हाण याचा असल्याचे त्याचे नातेवाईक सांगतात. मग हा मृतदेह गणेशच्या नातेवाईकांच्या ताब्यातही दिला जातो.
तपासादरम्यान संशय येतो आणि गणेश चव्हाण हा जिवंत असल्याचं तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे समोर येतं. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा लातूरचं एक पथक गणेश चव्हाणचा पाठलाग करतं आणि त्याला विजयदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथुन ताब्यात घेतलं जातं.
मग खरी स्टोरी समोर येते. गणेश चव्हाण हा मागच्या एक ते दिड वर्षापासुन आर्थीक अडचणीमध्ये आलेला. त्याने मागील तिन वर्षापासुन एक कोटीचा टर्म इन्सुरन्स काढलेला होता. त्याच्यावर सत्तावन्न लाख रुपये कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी तो मागील एक महिण्यापासुन स्वत आत्महत्या करण्याचा किंवा इतर एखादया व्यक्तीचा खुन करुन तो स्वतःचा असल्याचा बनाव करण्याचा विचार करत होता. असे केल्यानंतर ईन्सुरन्सचा लाभ कुंटुंबाला मिळेल व त्याने काढलेले कर्ज निल होईल असा त्याचा विचार होता.
त्याचाच प्लॅन करुन गणेश गाडी घेऊन १३ डिसेंबरला घराबाहेर पडला. तो याकतपुर रोड चौकात आला. आणि त्याला याच ठिकाणी त्याचं टार्गेट सापडलं. गोविंद यादव यांनी हात दाखवुन गणेशला लिफ्ट मागितली. मग गणेश चव्हाणनं गाडी थांबवली. गोविंद यांनी गणेशला त्यांना औसा किल्ला जवळ सोडण्यास सांगीतले. तेव्हा गोविंद हे दारु प्यायलेले होते. गणेशने गोविंद यादव यांना काही खाणार का असं विचारलं. त्यांनी चिकन खातो असे सांगीतले, त्यानंतर एका ढाब्यावरुन त्यांच्यासाठी चिकन घेतले. मग गणेशनं गाडी वानवडा पाटी ते वानवडा जाणाऱ्या रस्त्यावर घेतली. अंदाज घेतला आणि गोविंद यादव यांना चिकन खाण्यासाठी दिले. थोडे चिकन खावुन नंतर खाण्यास नकार देवुन गोविंद नशेतच गाडीमध्ये झोपी गेले.. गणेशनं उरलेले चिकन डब्बासह बाजुचे शेतात फेकले. गोविंद यादव यांच्या खिशातील देशी दारुचे बाटल्या काढुन घेतल्या. यावेळी एक बाटली अंधारात खाली पडली.
मग गणेशनं गोविंद यांना डायव्हर शिटवर ओढुन बसवले व शिट बेल्ट लावला. आणि प्लास्टीक पिशव्या शिटवर टाकुन काडी ओढुन गाडी पेटवून दिलीं. जाताना लवकर पुर्ण गाडीने पेट घ्यावा म्हणुन पेट्रोल टाकीचे झाकन उघडुन ठेवलं आणि गणेश तिथून निघाला. नंतर तो तुळजापुर रोडला पायी चालत आला आणि ट्रॅव्हल्सने कोल्हापुरला पोहोचला तिथून तो विजयदुर्गला पोहोचला. इथेच पोलिसांनी त्याला अटक केली. गणेशनं या कृत्याची कबुलीही दिलीय. लातूर पोलीसांच्या 24 तासात हे प्रकरण उघडकीस आणलं आणि आरोपीला बेड्या ठोकल्यात.
कसलं खतरनाकाय ना हे.. आता खरी गोष्ट कुठून सुरु होते ते बघा. आरोपी गणेश एका खाजगी कंपनीत काम करायचा. पत्नी आणि मुलांसह मुंबईत राहत होता. त्याने यापूर्वी ₹५७ लाख (५.७ दशलक्ष रुपये) कर्ज घेऊन फ्लॅट खरेदी केला होता. कमी पगारामुळे आणि घरखर्चामुळे तो ईएमआय भरू शकत नव्हता. यामुळे निराश होऊन त्याने काही वेळा आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला मुंबईहून लातूर जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी, औसा येथे बोलावले.
तो त्याच्या कुटुंबासह औसा येथे गेला. तथापि, मुंबईत घेतलेल्या फ्लॅट कर्जाचे ईएमआय कसे फेडायचे याची त्याला चिंता होती. या काळात, त्याने स्वतःच्या नावावर १ कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढला होता. १३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता गणेश त्याची गाडी आणि लॅपटॉप घेऊन घराबाहेर पडला. तो औसा शहरातील तुळजापूर वळणावरून त्याची गाडी घेऊन गेला. त्याच्या डोक्यात कदाचित प्लॅन शिजतच होता, टर्ममधले पैसे दिसत होते, हे पैसे येतील आणि आपण कर्जमुक्त होऊ असं कदाचित त्याला वाटत असावं. आणि गोविंदच्या रुपानं त्याला प्लॅनसाठी माणूस चालून आला. गोविंद यांना मागितलेली लिफ्ट जिवाशी आली. गणेश पोलिसांना सापडला, दोन कुटुंबं २४ तासात उद्धवस्त झाली.
ADVERTISEMENT











