Crime News : जयपूरच्या बिंदायका भागात एका 22 वर्षीय तरुणाने आपल्या 8 महिन्यांच्या गरोदर लिव्ह-इन पार्टनरची गळा आवळून हत्या केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर आरोपीने तिचा मृतदेह राहत्या घराच्या अंगणात खड्डा करून पुरला आणि घटनास्थळावरून पोबारा केला. किरण (वय 32) असे मृत महिलेचे नाव असून, आरोपी प्रवेश रावत याने तिच्यावर मोबाईलवरून दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असल्याचा संशय घेतला होता. याच संशयावरून झालेल्या भांडणातून ही अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
संशयातून हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवेश रावत हा किरणचा पुतण्या होता; मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते प्रेमात होते आणि जयपूरमध्ये एकत्र राहत होते. जानेवारी महिन्यात प्रवेश किरणला तिच्या घरातून घेऊन आला होता आणि तिने गर्भवती राहिल्यानंतर तोच तिची काळजी घेत होता. दोघांकडे एकच मोबाईल फोन होता, जो प्रवेश कामावर जाताना किरणकडे सोडून जायचा. मात्र, किरण फोनवर इतर कोणाशी तरी बोलत असल्याचा संशय त्याला आला आणि त्यावरून त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागले. 23 सप्टेंबरच्या सकाळी याच वादातून प्रवेशने किरणचा गळा आवळून खून केला.
हे ही वाचा : तीव्र दुष्काळ असलेल्या भागांना दिलासा मिळणार? अंदाज काय?
मृतदेह घरासमोरच पुरला अन्...
हत्येनंतर आरोपीने गुन्हेगारीवर आधारित चित्रपट पाहून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला. त्याने घरासमोर खड्डा खोदून मृतदेह त्यात पुरला आणि मृतदेह लवकर कुजावा म्हणून त्यावर सुमारे 2 किलो मीठ टाकले. हत्येच्या दुसऱ्या दिवशी त्याने घराला कुलूप ठोकले आणि सामोद हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. संशय येऊ नये म्हणून तो 25 आणि 26 सप्टेंबर रोजी कारखान्यात कामावरही गेला. अखेर 26 सप्टेंबरच्या रात्री त्याने आपल्या कुटुंबाला किरणच्या मृत्यूची माहिती दिली आणि मोबाईल फोन बंद करून जयपूरमधून पळ काढला.
हे ही वाचा : गुप्तांग कापलेलं अन्... प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर एकच खळबळ
पोलिसांसमोर रचला बनाव
पोलीस तपासादरम्यान आरोपीचा मोबाईल फोन पुन्हा सुरू झाल्यावर पोलिसांनी उत्तर प्रदेश सीमेजवळून त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपीने किरणने आत्महत्या केल्याचा आणि भीतीने मृतदेह पुरल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. बिंदायका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमागील नेमका हेतू आणि घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT












