Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून दोन मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी 65 वर्षीय तुकाराम राऊत यांनी आपल्या दोन्ही मुलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. संजय तुकाराम राऊत आणि राजेंद्र तुकाराम राऊत अशी ज्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आलीये, त्या दोन्ही मुलांची नावं आहेत. हे दोन्ही मुलं आपल्या कुटुंबासह आई-वडिलांपासून विभक्त राहतात. तुकाराम राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 30 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तरंगवाडी गावाच्या हद्दीत सलीम लॉन्सजवळील डांबरी रस्त्यावर ही घटना घडली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : बाळासाहेबांचं निधन, ठाकरेंचं 'पक्षप्रमुख' पद.. शिंदेंचे वकील 'या' युक्तिवादाने गेम फिरवणार?
तुकाराम राऊत आणि त्यांच्या पत्नीला दांडक्याने मारहाण
तुकाराम राऊत यांच्या म्हणण्यानुसार, ते आणि त्यांची आजारी पत्नी अंजना तुकाराम राऊत दोघेही रस्त्यावरून फिरत होते. त्याचवेळी त्यांची दोन्ही मुलं संजय आणि राजेंद्र हे टाटा कंपनीच्या नेक्सॉन चारचाकी वाहनातून तिथे आले. दोन्ही मुलांनी आई अंजना यांच्या नावावर असलेली जमीन का विकली, असा सवाल केला. त्यानंतर दोघांनी हातातील लाकडी दांडक्याने तुकाराम राऊत आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या मारहाणीत तुकाराम राऊत यांच्या पाठीवर, तोंडावर, दोन्ही पायांच्या मांडीवर आणि डाव्या खांद्यावर दुखापत झाली. तर त्यांच्या पत्नी अंजना यांच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ आणि कमरेला मारहाण करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
जमीन परत घेतली नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
मारहाणीनंतर दोन्ही मुलांनी विकलेली जमीन परत माघारी घ्या, अन्यथा तुम्हाला आमचा हिसका दाखवतो, असं म्हणत शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप तुकाराम राऊत यांनी केला आहे. तसंच जमीन परत घेतली नाही तर जीवे मारण्याची धमकीही दिल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या वृद्ध दांपत्याच्या भांडणाचा आवाज ऐकून रस्त्यावरून जाणारे लोक तिथे जमा झाले. त्यापैकी कोणीतरी पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतलं. त्यानंतर पोलिसांनी तुकाराम राऊत आणि त्यांच्या पत्नीला रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर औषधोपचार सुरू असल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं आहे.
या संपूर्ण प्रकरणात तुकाराम राऊत यांनी आपल्या दोन्ही मुलांविरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे. मात्र, अंजना यांच्या नावावरील जमीन नेमकी का विकण्यात आली किंवा या कुटुंबामध्ये जमिनीवरून नेमका काय वाद आहे, याचा अधिक तपशील तक्रारीत दिलेला नाही. कुटुंबातील अंतर्गत वाद असला तरी स्वतःच्या आई-वडिलांना मारहाण केल्याचा आरोप या घटनेमुळे समोर आला आहे. आता या तक्रारीच्या आधारे पोलिसांकडून दोन्ही मुलांविरोधात पुढे कोणती कारवाई केली जाते, त्यांना ताब्यात घेतलं जातं का किंवा अटक होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT












