Pune Crime News , पुणे : शहरात सुरू असलेल्या अनधिकृत कृत्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली असतानाच, विमाननगर परिसरात एक थरारक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. एका स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली असता, पोलिसांच्या भीतीने खिडकीतून उडी मारणाऱ्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेत स्पा सेंटरचा व्यवस्थापकही गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
विमाननगरमधील 'सिटी स्पेस' या इमारतीत एक स्पा सेंटर चालवले जात होते. या ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती विमाननगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास या स्पा सेंटरवर छापा टाकला. पोलीस पथक स्पा सेंटरच्या दरवाजापाशी पोहोचले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा ठोठावून तो उघडण्यास सांगितले. मात्र, आत असलेले कर्मचारी आणि तरुणी घाबरले. पोलिसांच्या कारवाईतून वाचण्यासाठी स्पा सेंटरमधील तरुणी आणि व्यवस्थापकाने इमारतीच्या खिडकीतून थेट खाली उडी मारली.
हेही वाचा : 'पवार साहेबांचा हुकमी एक्का अजित पवारच होते...', जयंत पाटलांचं मोठं विधान
तरुणीचा मृत्यू आणि व्यवस्थापक जखमी
खिडकीतून खाली पडल्यामुळे संकिता मुखर्जी नावाच्या तरुणीच्या डोक्याला भीषण मार लागला. तिला तातडीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याचवेळी तिच्यासोबत उडी मारलेला स्पा सेंटरचा व्यवस्थापकही खाली कोसळला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याचे हाड मोडल्याचे समजते. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
चार तरुणींची सुटका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या धाडीदरम्यान स्पा सेंटरमधून इतर चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या तरुणींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, या स्पा सेंटरमध्ये नेमके काय सुरू होते आणि या तरुणींना तिथे कशासाठी ठेवण्यात आले होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
प्रत्यक्षदर्शींचे गंभीर आरोप
या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. घटना घडल्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी पोलिसांनी पुरेशी तत्परता दाखवली नाही, असा आरोप या व्यक्तीने केला आहे. या आरोपामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता असून, पोलीस या संदर्भात अधिक चौकशी करत आहेत. पुण्यासारख्या शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
'त्या' बहिणींच्या मृत्यूचे गूढ वाढले, दोघींना तांत्रिकाकडे का नेण्यात आले? आईचा खळबळजनक आरोप
ADVERTISEMENT











