Crime News : एका प्रेमकथेचा अत्यंत दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली आहे. एका 19 वर्षीय बीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी मनीषा कुमारी हिने कुटुंबाच्या मर्जीविरोधात जाऊन तिचा प्रेमी दिलखुश कुमार (वय 20) याच्यासोबत घर सोडले होते. सोमवारी रेल्वे स्टेशन परिसरात दिलखुशने मनीषाच्या भांगात सिंदूर भरून तिच्याशी विवाह केला. दोघांनी या विवाहाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. परंतु, लग्नाचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही आणि काही तासांतच मनीषाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
इन्स्टाग्रामवर प्रेम, लग्न अन् मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा आणि दिलखुश यांची वर्षभरापूर्वी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली होती, ज्याचे नंतर प्रेमात रूपांतर झाले. मात्र, मनीषाच्या घरच्यांनी तिचा विवाह दुसऱ्या तरुणाशी ठरवला होता. या लग्नाला मनीषाचा विरोध असल्याने तिने दिलखुशसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. 10 ऑगस्ट रोजी दिलखुश तिला अररिया येथून घेऊन निघाला आणि दुपारी दोघे पूर्णिया जंक्शनवर पोहोचले. तेथे कोणत्याही कौटुंबिक उपस्थितीशिवाय दिलखुशने स्टेशनवरच मनीषाशी विवाह केला आणि तिने त्याला आपला पती मानले.
हे ही वाचा : मान्सून अपडेट: पाऊस आता देणार हुलकावणी? पाहा नेमका कशाचा होतोय परिणाम
अचानक आली चक्कर
लग्नानंतर सोमवारी (10 ऑगस्ट) संध्याकाळी दोघे रामबाग येथून सिटी काली मंदिराकडे दर्शनासाठी पायी जात होते. अत्यंत उष्ण वातावरण असल्याने वाटेत मनीषाला अचानक चक्कर येऊ लागली आणि तिची प्रकृती खालावली. दिलखुशने स्थानिक लोकांच्या मदतीने तिला तातडीने पूर्णिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (GMCH) दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचार सुरू केले तरी तिच्या स्थितीत सुधारणा झाली नाही आणि उपचारादरम्यानच मनीषाचा मृत्यू झाला. मुलीच्या घरच्यांनी इन्स्टाग्रामवरील लग्नाचे फोटो पाहून आधीच शोध सुरू केला होता, परंतु नंतर त्यांना तिच्या मृत्यूची माहिती मिळाली.
हे ही वाचा : Personal Finance: मुंबईत स्वत:च घर घेऊन EMI भरावा की Rent वर राहून SIP करावी?
मृत्यू नेमका कशामुळे?
या घटनेची माहिती मिळताच केहाट पोलीस ठाण्याच्या पथकाने रुग्णालयात पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी मनीषाचा पती दिलखुश याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. अररिया येथून निघण्यापासून ते स्टेशनवरील विवाह आणि त्यानंतर प्रकृती बिघडण्यापर्यंतच्या सर्व घडामोडींची वेळ आणि कारणे पोलीस शोधत आहेत. मनीषाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे प्रकरणात संशय निर्माण झाला असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT












