पतीच्या हत्येसाठी पत्नीची जमीन विकण्याची तयारी, अनैतिक संबंधांसाठी संपवलं

मुंबई तक

• 08:00 AM • 03 Oct 2026

muzaffarnagar crime news : मुजफ्फरनगरमध्ये शेतकरी प्रवीण यांच्या हत्येप्रकरणी पत्नी, तिचा प्रियकर आणि अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. पतीच्या हत्येसाठी पत्नीने जमीन विकण्याची योजना आखली होती, तर प्रियकराने दोघांना प्रत्येकी 3 लाखांची सुपारी दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.

muzaffarnagar crime news

muzaffarnagar crime news

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पतीच्या हत्येसाठी पत्नीची जमीन विकण्याची तयारी

point

अनैतिक संबंधांसाठी संपवलं

muzaffarnagar crime news : मुजफ्फरनगरमध्ये शेतकरी प्रवीण उर्फ परविंदर यांच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी 60 तासांत छडा लावलाय. परपुरुषासोबत असणारे प्रेमसंबंध आणि पतीकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून पत्नीने हत्या घडवून आणल्याचा पोलिसांचा आरोप आहे. मुजफ्फरनगरच्या रतनपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबरपूर येथील जंगलात 27 सप्टेंबर रोजी 50 ते 52 वर्षीय शेतकरी प्रवीण उर्फ परविंदर यांची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी पुरावे आणि घटनाक्रमाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचले.

हे वाचलं का?

हेही वाचा : प्रदीप पुर्णेकरांची कॉन्ट्रॅक्ट किलिंग झाल्याचे आरोप, मिनाक्षी शिंदे यांचे पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर

पती दारु पिऊन मारतो, त्रस्त होऊन प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय  

या प्रकरणात पोलिसांनी मृत प्रवीण यांची पत्नी रेखा, तिचा प्रियकर विकास, राजा उर्फ काला आणि कल्याण सिंह यांना अटक केली आहे. सुरुवातीला या हत्येमागे बाहेरील व्यक्तीचा हात असण्याची शक्यता व्यक्त होत असताना तपासाची दिशा मृताच्या घरातील व्यक्तींपर्यंत पोहोचली. पोलिसांच्या चौकशीत रेखा आणि कौटुंबिक परिचित विकास यांच्यात 2018-19 पासून प्रेमसंबंध असल्याचे समोर आल्याचे सांगण्यात आले. रेखा आणि प्रवीण यांचा विवाह 2006 मध्ये झाला होता. चौकशीत रेखाने पती दररोज दारू पिऊन तिच्यासोबत मारहाण करत असल्याचे सांगितल्याचा पोलिसांचा दावा आहे. यामुळे त्रस्त होऊन आणि विकाससोबत राहण्याच्या इच्छेने तिने पतीची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले. 

हेही वाचा : तलावात बुडून चिमुकल्याचा मृत्यू, आई-वडिलांचा एकमेकांवर संशय; आरोपी नेमका कोण?

जमीन 10 लाख रुपयांना विकण्याची तयारी 

हत्या घडवून आणण्यासाठी रेखाने आपली जमीन 10 लाख रुपयांना विकण्याची योजना आखली होती. या कटात विकासने त्याच्या परिचयातील राजा उर्फ काला आणि कल्याण सिंह यांना सहभागी करून घेतले. दोघांना प्रत्येकी 3 लाख रुपये देण्याचे ठरल्याचे पोलिसांनी सांगितले. राजा याच्याकडे प्रवीणचे 1.5 लाख रुपये देणे बाकी होते. हे पैसे परत मिळत नसल्याने तोही हत्येसाठी तयार झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, 27 सप्टेंबर रोजी कटानुसार प्रवीण यांना अंबरपूर येथील जंगलात बोलावण्यात आले. त्यानंतर राजा आणि कल्याण सिंह यांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात प्रवीण यांचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालातही त्यांच्या शरीरात दोन गोळ्या लागल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून या घटनेत वापरलेले दोन देशी बनावटीचे कट्टे, काडतुसे, एक स्विफ्ट कार, घटनेत वापरलेला मोबाईल फोन आणि प्रवीण यांची मोटारसायकल जप्त केली आहे. पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगितले आहे.