लोकलमध्ये महिलांची छेड काढल्याचा आरोप, पोलीस अन् तरुणांनी थेट पुलावरुन उचलून आणलं..

मुंबई तक

• 12:12 PM • 02 Oct 2026

Mumbai Crime News : मुंबईतील कुर्ला स्थानकावर महिलांची छेड काढल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला प्रवासी आणि पोलिसांनी रेल्वे पुलावरून खाली आणल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची दखल घेत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या डीआरएमच्या अधिकृत खात्याने आरपीएफला चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Mumbai man accused of harassing women in train

Mumbai man accused of harassing women in train

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

लोकलमध्ये महिलांची छेड काढल्याचा आरोप,

point

पोलीस अन् तरुणांनी थेट पुलावरुन उचलून आणलं..

Mumbai Crime News : मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकावर महिलांची छेड केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला प्रवासी आणि पोलिसांनी रेल्वे पुलावरून खाली आणल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्यक्तीला लोकलमधील महिलांच्या डब्यात महिलांची छेड काढल्याच्या आरोपावरून पकडण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची दखल मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या डीआरएमच्या अधिकृत एक्स खात्याकडून घेण्यात आली. डीआरएमच्या खात्याने आरपीएफ मुंबई विभागाला या प्रकरणाकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा : भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, देवीची मूर्ती नेत असलेल्या भक्तांवर काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर काय घडलं?

हात आणि पाय पकडून आरोपीला खाली आणले 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही प्रवासी आणि पोलिस कर्मचारी एका व्यक्तीला रेल्वे पुलावरून खाली घेऊन जाताना दिसत आहेत. या व्यक्तीचे हात आणि पाय पकडून त्याला खाली आणले जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. त्याच्या मागे मोठ्या संख्येने लोकांची गर्दीही दिसत आहे. खाली आणले जात असताना संबंधित व्यक्ती विरोध करत असल्याचेही दिसून येते. तो स्वतःला सोडून देण्याची विनंती करताना ऐकू येतो. “भाई, मुझे बचा लो” असे तो म्हणताना व्हिडिओमध्ये ऐकायला येते.

हेही वाचा : कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्यामुळे 180 प्रवाशांचे प्राण कसे वाचले? कसं आहे मुंबई कनेक्शन?

हा व्हिडिओ ‘Harbour line users’ नावाच्या एक्स खात्यावरून शेअर करण्यात आला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये काही प्रवाशांनी महिलांच्या डब्यात महिलांची छेड काढणाऱ्या व्यक्तीला पकडून आरपीएफच्या ताब्यात दिल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, आरपीएफने ताब्यात घेण्यापूर्वी प्रवाशांनी संबंधित व्यक्तीला धडा शिकवल्याचाही दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर प्रवासी आणि पोलिस कर्मचारी या व्यक्तीला रेल्वे पुलावरून खाली घेऊन जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. मात्र, या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी स्पष्ट होत नाही.

 डीआरएमकडून व्हिडीओची दखल 

व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या डीआरएमच्या अधिकृत एक्स खात्याने या पोस्टची दखल घेतली. डीआरएमच्या खात्याने आरपीएफ मुंबई विभागाला टॅग करत “Kindly look into it” असे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष गेल्याचे दिसून येते. मात्र, व्हिडिओमध्ये दिसणारी घटना आणि महिलांच्या कथित छळासंदर्भातील परिस्थिती स्वतंत्रपणे पडताळता आलेली नाही. अधिकृत प्रतिक्रियेतही या घटनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.