मुंबई: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी पहाटे अडीच वाजता त्याच्या घरी झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. मुंबई पोलीस डीसीपी दीक्षित गेडाम यांनी माध्यमांना सांगितले की, 'ठाण्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याची ओळख मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद अशी झाली. प्राथमिक तपासानंतर, आम्हाला असे पुरावे सापडले आहेत ज्यामुळे आम्हाला असे म्हणता येते की आरोपी बांगलादेशी वंशाचा आहे. आम्ही लवकरच त्याची वैद्यकीय तपासणी करू आणि त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करू.' मुंबई पोलिस चौकशीसाठी आरोपीचा न्यायालयाकडून रिमांड मागतील.
ADVERTISEMENT
डीसीपी दीक्षित गेडाम म्हणाले की, आरोपीकडे कोणतेही वैध भारतीय कागदपत्र सापडले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पासपोर्ट कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. आरोपी 5-6 महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता आणि एका हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत होता. आरोपी सैफच्या घरी आधी आला होता का असे विचारले असता? याबाबत अद्याप आमच्याकडे कोणतीही ठोस माहिती नसल्याचे डीसीपी गेडाम यांनी सांगितले. तो चोरीच्या उद्देशाने पहिल्यांदाच सैफच्या घरात घुसला होता. असंही डीसीपी गेडाम यावेळी म्हणाले.
हे ही वाचा>> Saif Ali Khan Case: चोर बिल्डिंगमध्ये कसा घुसला? कुठे लपला? सैफवर हल्ला का केला? 'त्या' रात्रीचं सर्व सत्य आलं समोर
आरोपी शहजादने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, तो सैफ अली खानच्या घरात प्रवेश करत आहे हे त्याला माहीत नव्हते. आरोपीने सांगितले की, त्याचा हेतू फक्त चोरी करण्याचा होता आणि म्हणूनच तो घरात घुसला होता. अचानक सैफ अली खान त्याच्यासमोर आला आणि त्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला, ज्यामुळे तो जखमी झाला. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादबद्दल अधिक माहिती पोलीस गोळा करत आहेत आणि तो बांगलादेशी नागरिकच आहे का, तो भारतात बेकायदेशीरपणे कसा प्रवेश केला? हे सगळं शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.
मध्यरात्री सैफवर झाला होता हल्ला
सैफ अली खान त्याच्या कुटुंबासह वांद्रे येथील सतगुरु शरण बिल्डिंगच्या 11 व्या आणि 12 व्या मजल्यावर एका डुप्लेक्स फ्लॅटमध्ये राहतो. 15 आणि 16 जानेवारीच्या मध्यरात्री (पहाटे 2.30 वाजता) चोराने त्याच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने अनेक वेळा हल्ला केला. त्याला सहा जखमा झाल्या, त्यापैकी एक पाठीच्या कण्याजवळ होती.
हे ही वाचा>> Saif Ali Khan Case : आरोपी 5 तास वांद्रेमध्येच होता, एअरफोनही खरेदी केले, CCTV मध्ये काय काय आढळलं?
या हल्ल्यानंतर सैफला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर आपत्कालीन शस्त्रक्रिया करावी लागली. त्याच्या पाठीतून सुमारे 3 इंच लांबीचा चाकूचा तुकडा काढण्यात आला. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, तो 'धोक्याबाहेर' आहे आणि 20 जानेवारीपर्यंत त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.
ADVERTISEMENT
