Crime News : ऊस तोडून देण्याच्या बहाण्याने ऊसाच्या शेतात नेत एका चुलत्याने आपल्या 11 वर्षीय पुतणीवर बलात्कार केला आहे. अत्याचारानंतर अल्पवयीन पुतणीला बेशुद्धावस्थेत टाकून आरोपी चुलता फरार झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या ही घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील आहे.
ADVERTISEMENT
ऊसाच्या शेतात नेत अत्याचार
ही घटना 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी घडली. आरोपी चुलत्याने आपल्या 11 वर्षीय पुतणीला रामगंगा नदीच्या काठी असलेल्या ऊसाच्या शेतात नेले होते. 'आत चल, मी तुला चांगला ऊस तोडून देतो,' असे आमिष दाखवून त्याने तिला शेतात नेले आणि तिथे तिच्यावर बळजबरी केली. या झटापटीत आणि अत्याचारामुळे पीडिता गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यानंतर ती रक्ताळलेल्या अवस्थेत कशीबशी घरी पोहोचली आणि तिने रडत रडत आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला.
पोलिसांकडे जाऊ नये म्हणून रोखले
धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना उघडकीस आल्यानंतर आरोपीच्या बाजूच्या लोकांनी पीडित कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचू नये आणि आपापसात तडजोड व्हावी, यासाठी पीडित पक्षाला अडवून धरण्यात आले होते. मात्र, मंगळवारी संध्याकाळी या लोकांच्या तावडीतून सुटका करून घेत पीडित कुटुंबाने पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली. या विलंबामुळे आरोपीला पळून जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळाल्याची चर्चा परिसरात आहे.
हे ही वाचा : रंग खेळून नदीवर गेला अन् परतलाच नाही, वैनगंगेत बुडून इंजिनिअरचा मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी लाकडंच मिळेनात
आरोपी फरार
पोलिसांनी सांगितले की, पीडित पित्याच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. 'आरोपीला लवकरच अटक केली जाईल आणि त्याला कडक शासन दिले जाईल,' असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
ADVERTISEMENT











