UP Crime News : उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात आईने दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरून 22 वर्षीय मुलाने आपल्या सावत्र वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नवजोत (वय 30) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवदीप सिंह (वय 22) आणि त्याचा चुलत भाऊ राजनदीप सिंह (वय 23) यांना अटक केली आहे. 10 ऑक्टोबर रोजी ही हत्या झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि 48 तासांच्या आत दोन्ही आरोपींना अटक केली.
ADVERTISEMENT
नवजोत यांच्याशी केलेल्या दुसऱ्या लग्नामुळे मुलगा नाराज
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अवदीप हा त्याची आई कमल कौर हिने नवजोत यांच्याशी केलेल्या दुसऱ्या लग्नामुळे नाराज होता. कमल कौर या नवजोत यांच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या. या लग्नाला विरोध असल्याने अवदीपने चुलत भाऊ राजनदीप याच्यासोबत मिळून हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : पूर्णेकर हत्या : 'हो.. मी मारेकऱ्यांना ओळखतो...', शिवसेना नगरसेविका मिनाक्षी शिंदेंच्या पतीचा खळबळजनक जबाब
नवजोत हे तह कलां गावातील रहिवासी होते. कुम्हरिया कलां येथे त्यांचे गिल वॉशिंग हब नावाचे कार सर्व्हिस सेंटर होते. 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या दुकानात उपस्थित होते. त्यावेळी राखाडी रंगाच्या अल्टो कारमधून आलेल्या दोन जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली. गोळ्या लागल्याने नवजोत यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग सिंह यांनी या घटनेची माहिती देताना नवजोत यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील आणि इतर पुरावे गोळा केले. घटनेचे सीसीटीव्ही चित्रणही उपलब्ध होते. हे चित्रण अनेक लोकांपर्यंत पोहोचले होते. त्याच्या मदतीने आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.
पोलिसांनी या प्रकरणात वापरल्याचा आरोप असलेली राखाडी रंगाची अल्टो कार जप्त केली आहे. तसेच तीन बंदुका, सहा जिवंत काडतुसे आणि दोन रिकामी काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पाळत ठेवणारे पथक आणि स्थानिक पोलिसांनी तपास केला. दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी आणि शस्त्रे जप्त करण्यात आल्याचे अनुराग सिंह यांनी सांगितले. आरोपींना तुरुंगात पाठवण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. या प्रकरणातील एक आरोपी मृत नवजोत यांचा सावत्र मुलगा आहे, तर दुसरा आरोपी कमल कौर यांच्या आत्या भावाचा मुलगा म्हणजेच त्यांचा चुलत भाऊ आहे. दोघेही एकमेकांचे चुलत भाऊ असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या हत्येमागे कौटुंबिक वाद असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कमल कौर यांनी पहिल्या पतीच्या निधनानंतर नवजोत यांच्याशी लग्न केले होते. पहिल्या लग्नापासून त्यांना अवदीप आणि जोगनप्रीत सिंह अशी दोन मुले आहेत. ही दोन्ही मुले न्यूझीलंडमध्ये काम करतात. आईच्या दुसऱ्या लग्नामुळे दोन्ही मुलांमध्ये नाराजी होती, असे पोलिसांनी सांगितले. अवदीप हा हत्येच्या सुमारे पाच दिवस आधी न्यूझीलंडहून परतला होता. त्यानंतर त्याने राजनदीपच्या मदतीने नवजोत यांची हत्या केल्याचा आरोप आहे. नवजोत यांचे वडील निशान सिंह यांनीही सुनेच्या मुलांचा या लग्नाला विरोध असल्याचा आरोप केला आहे. तसेच आपल्या सुनेच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी संरक्षणाची मागणी केली होती. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT












