Crime News : एका नवऱ्याने आपल्या बायकोवर तब्बल सात गोळ्या झाडून तिची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी पती तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला होता. बाहेर आल्यानंतर त्याने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. भररस्त्यातच आरोपीने आपल्या पत्नीवर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अंजली असं मृत पत्नीचं नाव आहे. उत्तर प्रदेशातील बिरधाना परिसरातील ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबई : सराफ दुकानातून 7 कोटी 88 लाखांचे सोने चोरीला, कामगारांनीच डुप्लिकेट चावी करुन मारला डल्ला
पॅरोलवर आला बाहेर
संजय असं या आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमधील वादातून संजयने भररस्त्यात अंजलीवर गोळ्या झाडल्या आणि तो घटनास्थळावरून फरार झाला. विशेष म्हणजे, आरोपी संजय हा सराईत गुन्हेगार असून तो यापूर्वीच एका हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात होता. मागील होळीच्या वेळी त्याने दुजाना परिसरात एकाची हत्या केली होती. सध्या तो पॅरोलवर बाहेर आला होता आणि याच काळात त्याने आपल्या पत्नीचाही काटा काढला.
मृत महिलेच्या कुटुंबियांना सुरक्षा
पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास चक्रांना वेग दिला आहे. मंगळवारी डॉक्टरांच्या विशेष पथकाने पोस्ट मार्टम प्रक्रिया पूर्ण केली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी अंजलीच्या नातेवाईकांना सुरक्षा पुरवली आहे. तपास अधिकारी एसआय जयपान सिंह यांनी सांगितले की, अंजलीचे मामा हिम्मत सिंह यांच्या तक्रारीवरून आरोपी संजय विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत.
हे ही वाचा : 65 वर्षीय वृद्ध बायकोने 70 वर्षीय पतीवर डिझेल टाकून जाळलं, नंतर बाहेरून लॉक लावून काढला पळ
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
अंजलीचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बिरधाना गावात नेण्यात आले असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पॅरोलवर बाहेर आलेल्या गुन्हेगाराने पुन्हा अशा प्रकारचे कृत्य केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा देण्यात येईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहे. या घटनेमुळे पॅरोलवर बाहेर येणाऱ्या गुन्हेगारांच्या दहशतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ADVERTISEMENT











