Crime News: उत्तर प्रदेशाच्या बरेली येथील रहिवासी असलेल्या एका तरुणीने तिच्या दाजीवर गंभीर आरोप केल्याची बातमी समोर आली आहे. पीडितेच्या आरोपानुसार, तिचा दाजी तिला WhatsApp वर अश्लील मॅसेजेस पाठवायचा. आरोपीच्या या कृत्याला तरुणीने विरोध केला असता त्याने तिला तिचं आयुष्य उद्धवस्त करण्याची धमकी देण्यास सुरूवात केली. पीडिता तिच्या दाजीच्या धमक्यांना घाबरली आणि तिने पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांनी आरोपी दाजीसह दोन लोकांविरुद्ध FIR दाखल केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
फोन आणि व्हॉट्सअॅपवर अश्लील बोलणं...
पीडितेने पोलिसांना सांगितलं की, "गाजियाबादमध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. लग्नाच्या काही दिवसांनंतर, दाजीच्या वागण्यात बदल जाणवला आणि हळूहळू त्यांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ते फोन आणि व्हॉट्सअॅपवर अश्लील बोलू लागले. ते मस्करी करत असल्याचं आधी मला वाटलं, मात्र दिवसेंदिवस त्यांचं हे वागणं वाढू लागलं. मी त्यांना विरोध केल्यानंतर, त्यांनी मला धमक्या दिल्या."
लग्न होऊ देणार नसल्याची धमकी
पीडितेने पोलिसांना सांगितले की, आरोपी दाजीने तिचे काही फोटो एडिट करून ते आक्षेपार्ह बनवले होते. त्यानंतर त्याने ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. जर तिने असं केलं नाही तर ते फोटो सर्वांना पाठवण्याची आणि तिची बदनामी करण्याची देखील त्याने धमकी दिली. तसेच, तिचं लग्न होऊ देणार नाही आणि तिचं आयुष्य उद्धवस्त करण्याची सुद्धा तिला धमकी दिली.
हे ही वाचा: "बायकोने माझे अश्लील फोटो व्हायरल केले..." पतीने आपल्याच पत्नीविरुद्ध दाखल केली तक्रार! नेमकं प्रकरण काय?
पीडितेने दाखल केली तक्रार
इतकेच नव्हे तर, आरोपीने तरुणीच्या वडिलांच्या मोबाईलवर तिचे एडिट केलेले अश्लील फोटो पाठवले. यामुळे पीडितेच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. सुरुवातीला बदनामीच्या भितीने कुटुंबातील सदस्य गप्प राहिले पण, आरोपीच्या धमक्या वाढत गेल्यानंतर तरुणीने धाडस दाखवून पोलिसांत तक्रार केली.
कमी हुंडा दिल्याच्या बहाण्याने 50 हजारांची मागणी
पीडितेने केलेल्या आरोपानुसार, लग्नात कमी हुंडा मिळाल्याच्या बहाण्याने तरुणीच्या दाजीने 50 हजार रुपयांची मागणी केली. तो म्हणाला, जर पैसे मिळाले नाहीत तर तो कुटुंबियांना खोट्या प्रकरणात अडकवेल. पीडितेने तिच्या बहिणीला याबाबत सांगितलं असता आरोपीने रागाच्या भरात पत्नीला बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर, पीडितेच्या आई-वडिलांना सुद्धा शिवीगाळ केली.
हे ही वाचा: राजगुरुनगर हादरलं, शिक्षक शिकवत असताना दहावीतील पुष्कराजचा गळा चिरला, खासगी क्लासमध्ये लहान मुलांचे गँगवॉर
या संपूर्ण घटनेमुळे तरुणी आणि तिचे कुटुंबीय खूप घाबरले आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून सुभाष नगर पोलिसांनी आरोपीसह दोन जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी आणि तपास केला जात आहे तसेच समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. सध्या, पोलीस तरुणीचे मोबाईल चॅट तपासत असून जबाब नोंदवत आहेत. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी आश्वासन दिलं आहे.
ADVERTISEMENT











