Crime News: समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता असली तरी, अजूनही समाजाकडून त्याच्या विरोध केला जात असल्याचं पाहायला मिळतं. पंजाबमधील तरनतारन येथील असाच एक धक्कादायक प्रकार सध्या चर्चेत आहे. येथे एक महिला तिचं लग्न 14 दिवसांवर येऊन ठेपलं असताना, आपली गर्लफ्रेंड म्हणवणाऱ्या महिलेसोबत पळून गेल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT
तरुणीच्या मैत्रिणीचा धक्कादायक दावा...
मिळालेल्या माहितीनुसार, मुरादपूरा परिसरात राहणाऱ्या लखविंदर कौर नावाच्या तरुणीचं 14 जानेवारी रोजी एका तरुणासोबत लग्न ठरलं होतं. तिच्या लग्नाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. कन्यादानापासून ते हुंड्यापर्यंत सर्व काही ठरवण्यात आलं होतं. लग्नाच्या पत्रिका देखील छापण्यात आल्या होत्या. घरात आनंदाचं वातावरण होतं. दरम्यान, लखविंदरची मैत्रीण सुनीताने तिच्या कुटुंबियांसमोर धक्कादायक दावा केला. ती कधीच लखविंदरचं दुसऱ्या कोणासोबत लग्न होऊ देणार नसल्याचं तिने सांगितलं. ती म्हणाली, त्या दोघी एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. सुरुवातीला, तरुणीच्या आईने मस्करी समजून या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं.
हे ही वाचा: पालघर : सलूनमध्ये 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' गाणं मोठ्या आवाजात वाजवलं, पोलिसांनी आरोपीला उचललं...
मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप
पण 24 डिसेंबरच्या सकाळी घरातील आनंदाचं वातावरण अचानक बदललं. सकाळी 10 वाजताच्या सुमारास सुनीता तिची मैत्रीण लखविंदर कौरला सोबत घेऊन पळून गेली आणि दोघी अचानक घरातून गायब झाल्या. कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांच्याबद्दल कुठेच माहिती मिळाली नाही. घरातून अचानक मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आणि समाजात बदनामीची भिती सुद्धा वाटली. त्यानंतर, लखविंदरच्या आईने पोलिसात तक्रार दाखल करत सुनीताने तिच्या नातेवाईकांसोबत मिळून आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप केला. तिच्या म्हणण्यानुसार, मुलीचं लग्न मोडल्याने कुटुंबियांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे आणि त्यामुळे तिने पोलिसांकडे न्यायाची मागणी केली.
हे ही वाचा: नांदेड: विनयभंगाच्या आरोपाखाली तुरुंगात गेला, मनात सुडाची भावना अन् जामीनावर सुटल्यानंतर पीडितेच्या पतीलाच जाळलं...
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे. तसेच, या प्रकरणासंबंधी तक्रार नोंदवण्यात आली असून महिला पोलीस अधिकाऱ्याकडे याचा तपास सोपवण्यात आल्याचं डीएसपी यांनी सांगितलं. तसेच, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











