Devendra Fadnavis on Election Commission : मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज (दि. 15) मतदान प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी राज्यातील विविध भागांतून समोर येत आहेत. काही मतदारांनी बोटावरील शाई सहज पुसली जात असल्याचा दावा केल्याने या मुद्द्यावर चर्चेला उधाण आले आहे. या संदर्भात ‘मुंबई Tak’ने फॅक्ट चेक केला असता, काही ठिकाणी शाई पुसली जात असल्याची बाब समोर आली आहे. विशेषतः नखावर लावलेली शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
मतदान करून बाहेर पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “या बाबी निवडणूक आयोग ठरवतो. यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये मार्कर पेनचा वापर करण्यात आला आहे. कोणाची तक्रार असेल तर निवडणूक आयोगाने त्याकडे लक्ष द्यावे. मात्र, काही लोक उद्याचा निकाल लागल्यानंतर काय उत्तर द्यायचं, याची तयारी करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाही अधिक मजबूत करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झाले पाहिजे. मतदान हा केवळ अधिकार नसून ते प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मतदान न करणे म्हणजे कुठेतरी आपल्या कर्तव्यापासून दूर जाण्यासारखे आहे. मी मतदान केले आहे, सर्व नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
चांगले मतदान झाले तर चांगले प्रतिनिधी निवडून येतात आणि त्यातूनच विकास साधला जातो. उत्तम शहरे घडवायची असतील तर 29 महानगरपालिकांमधील नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.
दरम्यान, प्रचारादरम्यान घडलेल्या हिंसाचारावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर अतिशय वाईट पद्धतीने हल्ला करण्यात आला. काँग्रेस पक्षातील लोकांनी हा भ्याड हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला. या हल्ल्यात शिंगणे यांचा हात फ्रॅक्चर झाला असून, सोबत असलेल्या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ठोकशाही लोक स्वीकारणार नाहीत, लोकशाहीच जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागाकडून स्पष्टीकरण
दरम्यान, शाई पुसली जात असल्याच्या आरोपांवर बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याबाबत महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. त्यामुळे माध्यमांत प्रसारित होत असलेल्या वृत्तांमध्ये तथ्य नाही, असा दावा करण्यात आला आहे.
मात्र, यापूर्वी पत्रकारांशी फोनवर झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान, नखावर लावलेली शाई पुसली जात असून त्वचेवरील शाई टिकून राहत असल्याचे वक्तव्य झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणावर निवडणूक आयोगाची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
BMC Elections 2026 LIVE Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे लाइव्ह अपडेट्स... किती टक्के मतदान?
ADVERTISEMENT










