Tasgaon Nagarpalika Election Result : विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढत संजयकाका पाटील यांनी तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत दमदार पुनरागमन केलं आहे. स्वाभिमानी विकास आघाडीने थेट नगरपालिकेची सत्ता काबीज करत आमदार रोहित पाटील यांच्या गटाला म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. एकूण 24 जागांच्या नगरपालिकेत संजयकाकांच्या स्वाभिमानी विकास आघाडीने 13 जागांवर विजय मिळवला, तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 11 जागांवर समाधान मानावं लागलं. नगराध्यक्षपदी स्वाभिमानी विकास आघाडीचे विजया पाटील विजयी झाल्या.
ADVERTISEMENT
विधानसभा निवडणुकीत सलग पराभवाला सामोरे गेलेल्या संजयकाका पाटील यांच्यासाठी हा निकाल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दोन पराभवानंतर अखेर तासगावच्या जनतेने संजयकाकांच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्याने निकाल जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला. दुसरीकडे, आर. आर. आबांचे सुपुत्र आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा पराभव झाल्याने त्यांच्या गटात निराशेचं वातावरण आहे.
विजयानंतर संजयकाका पाटील यांनी 'मुंबई तक'शी बोलताना तासगावच्या मतदारांचे आभार मानले. “कुठला पक्ष, चिन्ह किंवा संस्था यांच्याशिवाय केवळ कामाच्या जोरावर ही निवडणूक जिंकली आहे. जनतेच्या प्रेमावर आणि विश्वासावर आम्ही विजयी झालो असून, यापुढेही तासगावच्या विकासासाठी चांगलं काम करू,” अशी ग्वाही त्यांनी दिली. या विजयामुळे व्यक्तिकेंद्री नेतृत्व आणि स्थानिक विकासकामांवर आधारित राजकारणाला मतदारांनी पसंती दिल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा : मोहिते पाटील पॅटर्न, राम सातपुतेंचा सुपडा साफ, सोलापुरातील 5 नगरपालिकांमध्ये भाजपचे कमळ कोमेजले
दरम्यान, संजयकाका पाटील यांनी विरोधी गटावर सूचक पण धारदार टीका केली. “वाघाचं पिल्लू सर्कसवाल्यांच्या ताब्यात जाऊ देण्यापेक्षा जनतेनं ते पुन्हा सांभाळलं आहे. पोस्टर बॉयचा आता खऱ्या अर्थाने पंचनामा सुरू करतो,” असं वक्तव्य करत त्यांनी आमदार रोहित पाटील यांचं नाव न घेता टोला लगावला. तासगावमधील विजय रॅलीदरम्यानही त्यांनी विरोधकांना लक्ष्य करत “काही जण काकांना संपवण्याचा प्रयत्न करत होते, पण जनतेनं हे होऊ दिलं नाही,” असं म्हटलं.
या निकालामुळे तासगावच्या राजकारणात पुन्हा एकदा संजयकाका पाटील यांचं वजन वाढल्याचं मानलं जात आहे. नगरपालिकेतील सत्ताबदल हा केवळ स्थानिक पातळीवरील निकाल नसून, आगामी राजकीय समीकरणांसाठीही तो महत्त्वाचा ठरणार आहे. एकीकडे रोहित पाटील गटासाठी हा पराभव आत्मपरीक्षणाचा धक्का मानला जात असताना, दुसरीकडे संजयकाका पाटील यांच्यासाठी हा आत्मविश्वास वाढवणारा विजय ठरला आहे. तासगाव नगरपालिकेच्या माध्यमातून पुढील काळात कोणता विकासाचा अजेंडा राबवला जातो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिल आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा हादरा, नेतृत्वात लढलेल्या सर्व नगरपालिका निवडणुकांमध्ये सुपडा साफ
ADVERTISEMENT











