मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल म्हणजेच जय भानुशाली आणि माही विज यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात तणाव असल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि आता त्या खऱ्या ठरल्या आहेत. जय आणि माही यांनी 14 वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला पूर्णविराम देत अधिकृतपणे घटस्फोट घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.
ADVERTISEMENT
दोघांनी आपलं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. शेवटी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, जय आणि माही यांच्यामध्ये बराच काळ खटके उडाले होते. त्यातून दोघांनी काही महिन्यांपूर्वी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. गेल्या काही महिन्यांपासून ते स्वतंत्र राहत होते, आणि आता त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
जुलै महिन्यातच सुरु झाल्या होत्या घटस्फोटाच्या चर्चा
जय भानुशाली आणि माही विज यांच्या घटस्फोटाच्या अफवा यावर्षी जुलैमध्येच ऐकायला मिळत होत्या. त्या वेळीच दोघांनी घटस्फोटाच्या कागदांवर सही केल्याचे म्हटले गेले होते. जुलै-ऑगस्टच्या दरम्यान त्यांनी दोघांनी वैवाहिक नाते सहमतीने संपवले. दोघांनी एकत्र येऊन संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मनोमिलन न झाल्याने अखेरीस विभक्त होण्याचा निर्णय घ्यावा लागला.
हेही वाचा : पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार अखेर रद्द, बिल्डर विशाल गोखलेंनी मेल पाठवला; आता रवींद्र धंगेकर म्हणाले...
2011 मध्ये झाला होता विवाह
जय भानुशाली (वय 40) यांनी अभिनेता म्हणूनच नव्हे, तर लोकप्रिय होस्ट म्हणूनही टीव्ही इंडस्ट्रीत नाव कमावले आहे. तर माही विज (वय 43) या ‘लागी तुझसे लगन’, ‘लाल इश्क’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचल्या. 2011 साली दोघांनी विवाह केला होता. मात्र 14 वर्षांनंतर हे नातं तुटल्याने त्यांचे चाहते निराश झाले आहेत. माही या जयपेक्षा तीन वर्षांनी मोठ्या आहेत, आणि त्यांच्या प्रेमकहाणीची चर्चा एकेकाळी बॉलिवूड आणि टीव्ही जगतात जोरदार रंगली होती.
मुलांच्या संगोपनाचा प्रश्न
जय आणि माही यांनी 2017 मध्ये त्यांच्या घरातील हाऊसहेल्पच्या दोन मुलांना दत्तक घेतले होते, मुलगा राजवीर आणि मुलगी खुशी. त्यानंतर 2019 मध्ये माहिने त्यांच्या मुलगी तारा हिला जन्म दिला. सध्या दोघेही आपल्या तिन्ही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी संयुक्तपणे पार पाडण्याची तयारी दाखवत आहेत. मात्र, कस्टडीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जय आणि माहि हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक आवडते जोडपे मानले जात होते. त्यांच्या सोशल मीडियावरील केमिस्ट्रीला चाहते नेहमीच दाद देत असतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











