बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि मोहक अभिनेत्री म्हणून ओळख असलेली महिमा चौधरी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. वयाच्या 52 व्या वर्षी ती पुन्हा लग्न करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. कारणही तसंच महिमाने स्वतः मीडियासमोर “उद्या माझं लग्न आहे, या माझ्या लग्नाला” असं हसत-खेळत आमंत्रण दिलं आणि सर्वांनाच अवाक् करून सोडलं.
ADVERTISEMENT
अलिकडेच ती एका कार्यक्रमात पोहोचली असताना पॅपराझींनी तिला फोटोसाठी थांबवले. तेवढ्यात महिमाने हलक्याफुलक्या अंदाजात, “कल मेरी शादी होने वाली है… आप सब आना” असं म्हणत पुढे चालत गेली. हे संपूर्ण संभाषण कॅमेरात कैद झालं आणि काही सेकंदांत इंटरनेटवर व्हायरलही झालं. 90 चं दशक गाजवणारी, चेहऱ्यावर सदैव तेज असलेली ही अभिनेत्री दुसरं लग्न करतेय का, असा प्रश्न अनेकांना पडला.
खरोखरच महिमा चौधरी दुसरं लग्न करतेय का?
याच व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर ती दुसरं लग्न करणार असल्याची चर्चा रंगली. अनेकांना वाटलं की महिमा आयुष्यात नवा अध्याय सुरू करणार आहे. मात्र, या चर्चेमागचं सत्य वेगळंच आहे. महिमा चौधरी प्रत्यक्षात लग्न करत नाहीये, तर तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती हा गमतीदार प्रयोग करत आहे.
‘दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी’ या तिच्या नव्या चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी ती मुद्दाम लग्नाचा उल्लेख करतेय. या सिनेमात ती अनुभवी कलाकार संजय मिश्रा आणि व्योम यादव यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. प्रमोशनच्या निमित्ताने महिमाने काही कार्यक्रमांमध्ये लाल जोडा घालून हजेरीही लावली होती, ज्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलंय.
या चित्रपटाची कथा अत्यंत विनोदी पद्धतीने मांडली गेली आहे. कथानक एका तरुणाच्या आयुष्याभोवती फिरतं, जो स्वतःच्या लग्नासाठी धडपडताना स्वतःच्या वडिलांचं दुसरं लग्न करण्याचा अनोखा निर्णय घेतो. कारण साधं आहे. त्या तरुणाच्या सासरकडील मंडळींची अट असते की, घरात एखादी स्त्री असावी. ही अट पूर्ण न झाल्यास ते लग्न मान्य करणार नसतात. मग तो मुलगा आपल्या वडिलांसाठी योग्य स्त्री शोधायला निघतो आणि त्यातून निर्माण होणारी विनोदी परिस्थिती, गोंधळ, भावनिक नात्यांचा गुंता अशा पद्धतीने कथा उलगडते. या अनोख्या मिशनमध्ये त्याला कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, वडिलांची प्रतिक्रिया काय असते, नवी आई शोधण्याच्या प्रवासात कोणते विनोदी वळण येतात हे सर्व खुमासदारपणे दाखवण्यात आलं आहे.
चित्रपटात संजय मिश्रा महत्त्वाच्या भूमिकेत असून त्यांच्यासोबत महिमा चौधरी परत एकदा आकर्षक भूमिकेत दिसणार आहे. व्योम यादवही या कथानकाचा महत्त्वाचा भाग आहे. हलक्याफुलक्या नाट्यमय शैलीत रंगवलेला हा सिनेमा 19 डिसेंबरला प्रदर्शित होणार असून, त्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढत आहे.
महिमा चौधरी – अजूनही तितकीच लोकप्रिय
‘परदेस’ सारख्या सुपरहिट चित्रपटातून पदार्पण करून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी महिमा आजही चाहत्यांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या पन्नाशीनंतरही तिचं सौंदर्य जरा सुद्धा कमी झालेलं नाही. तिच्याबद्दलचा कौतुकाचा ओघ आणि तिच्या प्रत्येक हालचालीकडे लागलेली चाहत्यांची नजर—हेच तिच्या लोकप्रियतेचं मोठं कारण आहे. तिच्या या ‘लग्नाच्या’ चर्चेमुळे चाहत्यांमध्ये क्षणभर गोंधळ निर्माण झाला असला, तरी हा तिच्या आगामी चित्रपटाचा हुशार प्रमोशन स्टंट असल्याचं बोललं जातंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











