बिहारमध्ये राजकीय उलथापालथ! नितीश कुमारांच्या जदयूने भाजपची साथ सोडली

मुंबई तक

• 07:04 AM • 09 Aug 2022

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं सरकार पायउतार झाल्यानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जदयू आणि भाजपचा राजकीय संसार मोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार भाजपपासून दूर जाणार असल्याची चर्चा होती. आज झालेल्या जदयूच्या बैठकीत भाजपसोबतची आघाडी तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. नितीश कुमार जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा असेल, असा सूर […]

Mumbai Tak
Google CTA

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं सरकार पायउतार झाल्यानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जदयू आणि भाजपचा राजकीय संसार मोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार भाजपपासून दूर जाणार असल्याची चर्चा होती. आज झालेल्या जदयूच्या बैठकीत भाजपसोबतची आघाडी तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. नितीश कुमार जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा असेल, असा सूर जदयूच्या नेत्यांनी बैठकीत लावला.

हे वाचलं का?

बिहारच्या राज्यपालांची भेट घेणार नितीश कुमार

मात्र त्या दिवसापासून म्हणजेच सत्ता स्थापन झाल्यापासून दोन्ही पक्षांमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. अनेक मुद्द्यांवर या दोन्ही पक्षांमध्ये खटके उडत आहेत. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या खटक्यांचं रूपांतर आता भाजप आणि जदयू यांची युती तुटण्यात झालं आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे आता नितीश कुमार तेजस्वी यादव यांच्यासोबत जाऊन सरकार स्थापन करतील हे उघड आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत सुरुंग लावून भाजपने इथली सत्ता काबीज केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तसंच आज या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही झाला. अशात बिहारची सत्ता भाजपच्या हातून निसटते आहे.

बिहारमध्ये नितीश कुमारांनी सोडली भाजपची साथ

बिहारमध्ये नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडली आहे. त्यामुळे ते आरजेडी सोबत जाऊन म्हणजेच तेजस्वी यादव यांच्यासोबत जाऊन सरकार स्थापन करणार आहेत. या सगळ्या दरम्यान भाजपचे १६ मंत्री हे राज्यपालांना भेटून त्यांचा राजीनामा सादर करणार आहेत.

नितीश कुमार हे आता राजद आणि काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. भाजप आणि जदयू यांच्यात उडणारे खटके यामुळे नितीश कुमार हा मार्ग पत्करणार हे जवळपास निश्चित झालं होतं. राज्यपालांकडे नितीश कुमार यांनी भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे आता ते तेजस्वी यादव यांच्यासोबत जाणार हे नक्की झालंय.

जदयू आणि भाजपची युती का तुटली?

बिहारमध्ये जो राजकीय भूकंप झाला त्याचं कारण नेमकं काय आहे? हा प्रश्न उपस्थित होतोच आहे. नितीश कुमार हे महाआघाडी सोडून भाजपसोबत आले होते. तरीही त्यांनी बंडखोरी केली. नितीश कुमार यांच्या नाराजीचं मुख्य कारण फ्री हँड न मिळणं आहे. त्यामुळेच ते दिल्ली सरकारच्या कार्यक्रमांमध्येही कधी सहभागी झाले नाहीत. त्यांनी राज्यातही भाजपच्या नेत्यांसोबत सुरक्षित अंतर ठेवलं. RCP सिंह सारख्या नेत्यांनी जदयूऐवजी भाजपशी केलेली सलगी नितीश कुमार यांना मुळीच आवडली नाही. त्यामुळे त्यांच्या मनात बंडाची ठिणगी पडली.

RCP सिंह यांचा नेमका विषय काय?

जदयूचे माजी अध्यक्ष RCP सिंह हे केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. त्यांना जदयूमध्ये भाजपचा माणूस म्हणून पाहिलं जाऊन लागलं. कारण नितीश कुमार यांची मर्जी जाणून न घेता ते केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाले होते. नितीश कुमार यांनी त्यांना पुन्हा राज्यसभेवरही पाठवलं नाही. त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिपद सोडावं लागलं. त्यानंतर त्यांनी पक्षही सोडला. या चॅप्टरनंतर भाजप आणि जदयू म्हणजेच नितीश कुमार यांच्यातलं अंतर वाढत गेलं. त्याचा परिणाम आता भाजपला धक्का देण्यात झाला आहे.