भाजपला उद्धव ठाकरेंप्रमाणेच एकनाथ शिंदेही नको आहेत असं वक्तव्य करून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खळबळ उडवून दिली आहे. येत्या काही दिवसांत महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद अशा निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटासोबत युती करणार का? ते पाहावं लागेल असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. जर परिस्थिती अनुकूल दिसली तरच भाजप शिंदे गटासोबत म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत युती करेल असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
लोकशाहीत मतदार हा राजा असतो कुणी विसरू नये
सध्या राज्यात जे राजकारण सुरू आहे त्यावरूनही त्यांनी टीका केली आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो हे कुणीही विसरू नये. आत्ता जे काही चाललं आहे ती काही गादीची लढाई नाही. देशात लोकशाही आहे. लोकशाहीत मतदार राजा असतो तोच ठरवेल कुणाच्या हाती सत्ता द्यायची आणि तो ठरेल तोच माणूस त्या पदावर विराजमान होईल असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीबाबत काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
सध्या अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीबाबतही प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली आहे. आम्ही या निवडणुकीच्या बाबत वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. ही निवडणूक शिवसेनेसाठी महत्त्वाची आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवारही उभा आहे. त्याला आम्ही पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्याकडे अद्याप कुणीही पाठिंबा मागितलेला नाही. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला अनियंत्रित अधिकार दिले आहेत असाही टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
काँग्रेस किंवा शिवसेनेसोबत जाऊ
युतीबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारलं असता पहिलं प्राधान्य कुणाला हा विषय नाही. आमच्या पक्षाच्या अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सांगितलं होतं की काँग्रेस किंवा शिवसेनेसोबत जाऊ. या भूमिकेला कुणीही प्रतिसाद दिलेला नाही. पहिला प्रस्ताव कुणाकडून आला आणि तो सोयीचा वाटला तर भूमिका घेऊ असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
