नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मलिक यांच्याविरोधात हल्लाबोल केला. राज्यातल्या ठाकरे सरकारचे कपडे कसे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले आहेत हे फडणवीस यांनी उघड केले असल्याचे शेलार यांनी म्हटले. फडणवीस यांनी केलेले आरोप मलिक यांनी मान्य केले असल्याचा दावा शेलार यांनी केला. दीडपट कमी किंमतीत जागा मिळवली हे नवाब यांनी मान्य केले असल्याचे शेलार यांनी म्हटले. आम्हाला 25 रु. स्क्वेअर फूट मध्ये जमीन घ्यावी लागली असे नवाब मलिक सांगत आहेत असेही शेलार यांनी म्हटले. संपूर्ण इमारत भाडयाने कमी किंमतीत कशी मिळते, नवाब मलिक सामान्य जनतेला मूर्ख समजतात का, असा सवालही शेलार यांनी केला.
ADVERTISEMENT
अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध झाकण्यासाठी चांडाळचौकटी काम करत असून मुंबई 1993 बॉम्ब प्रकरणी आरोपीसोबत मलिक यांचे संबंध असल्याचे शेलार यांनी म्हटले. राज्याचे मंत्री आरोपांची कबुली देत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: एफआयर दाखल करून चौकशी करावी अशी मागणी शेलार यांनी केली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
मुंबईतल्या कुर्ला भागात LBS रोडवर जवळपास तीन एकर जागा आहे. एका गोडाऊनवाल्या कुटुंबाची ही जागा होती. अत्यंत महागडी ही जागा होती. त्याची एक पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल आणि शाहवली खान यांच्याकडे होती. या दोघांनी एलबीएस रोडवरची ही जागा सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे. सॉलिडस कंपनीच्या वतीने या कागदावर सही केली आहे ती फराज मलिक यांनी. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे. असा आरोप आता देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
स्वतः नवाब मलिकही काही काळासाठी या कंपनीत संचालक होते. शाहवली खान आणि सलीम पटेल या दोघांनी सॉलिडसला ही जागा फक्त 30 लाखांत विकली आहे. त्यातले 20 लाखच दिले आहेत. मला जी माहिती आहे त्यानुसार भाडे तत्त्वावर ही जागा दिली असेल त्यातून सॉलिडसला एक कोटी रूपये भाडं मिळतं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
2005 मध्ये जो व्यवहार झाला त्यावेळी तिथला दर काय होता? तर त्याच्या मागे पाईपलाईनच्या कच्च्या रोडवर 415 रूपये स्क्वेअर फूटने जागा घेतली ती मलिक कुटुंबाने घेतली होती. याच रोडवर एक जागा 2005 मध्ये एक जागा 2 हजार रूपये स्क्वेअर फूटने विकत घेतली आहे. सॉलिडसने याच वर्षी दोन अंडरवर्ल्डच्या लोकांकडून ही जमीन 25 रूपये स्क्वेअर फूटने घेतली आहे. मुंबईत उकिरड्याची जागाही 25 रूपये चौ. फुटाने घेतली असून 15 रूपये चौ. फुटाने पैसे दिले आहेत. आता प्रश्न हा आहे की मुंबईच्या गुन्हेगारांकडून ही जमीन का विकत घेतली गेली? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला होता. आता आशिष शेलार यांनीही नवाब मलिकांवर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT











