कोलकाता: पश्चिम बंगालमधील दुसर्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे ममता यांनी विरोधी पक्षांना लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
ADVERTISEMENT
मंगळवारी संध्याकाळी नंदीग्राममधील निवडणूक प्रचार संपल्यानंतर टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज बिगर भाजप नेत्यांना वैयक्तिकरित्या पत्र पाठवलं आहे. ममता बॅनर्जी यांनी या पत्रात म्हटले आहे की, लोकशाही वाचविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी भाजपविरोधात एकवटले पाहिजे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पत्रात असं म्हटलं आहे की, ‘मला असं वाटतं की, लोकशाही आणि संविधानावर भाजप जे हल्ले चढवत आहे त्याविरोधात एकजूट दाखवून प्रभावी संघर्ष दाखविण्याची वेळ आली आहे.’
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासारख्या बड्या नेत्यांना ममता बॅनर्जी यांनी हे पत्र लिहलं आहे. देशातील 5 मुख्यमंत्र्यांसह अनेक मोठ्या नेत्यांना हे पत्र लिहून भाजपविरोधात एकजूट होण्याच आवाहन त्यांनी केलं आहे.
यावेळी ममता बॅनर्जी यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह द्रमुक प्रमुख एमके स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्या व्यतिरिक्त के एस रेड्डी, फारुख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि दीपंकर भट्टाचार्य यांनाही पत्रं लिहलं आहे.
बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 30 जागांसाठी उद्या (1 एप्रिल) मतदान पार पडणार आहे. या 30 जागांसाठी तब्बल 171 उमेदवार रिंगणात आहेत. या 30 जागांमध्ये दक्षिण परगणाच्या 4, पश्चिम मदिनीपूरच्या 9, बांकुडाच्या 8 आणि पूर्व मदिनीपूरच्या 9 जागांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी म्हणजे 2016 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत या 30 जागांपैकी तब्बल 22 जागांवर तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला होता. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. इथे तेव्हापासून भाजपची बरीच ताकद वाढली आहे. त्यामुळे आता या विधानसभा निवडणुकीत भाजपचं कडवं आव्हान तृणमूल समोर असणार आहे.
ADVERTISEMENT
