नवाब मलिकांवर ईडीची कारवाई, नीरज गुंडेंना 8 तास आधीच कसं कळलं?

मुंबई तक

• 06:49 AM • 23 Feb 2022

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीचं एक पथक आज पहाटेच मुंबईतील घरी धडकलं. यानंतर नवाब मलिक यांना काही वेळाने ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं. पण या सगळ्या नीरज गुंडे या व्यक्तीच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. साधारण आठ तास आधी नीरज गुंडे यांनी एक सूचक ट्विट केलं होतं. ज्यानंतर […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीचं एक पथक आज पहाटेच मुंबईतील घरी धडकलं. यानंतर नवाब मलिक यांना काही वेळाने ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं. पण या सगळ्या नीरज गुंडे या व्यक्तीच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. साधारण आठ तास आधी नीरज गुंडे यांनी एक सूचक ट्विट केलं होतं. ज्यानंतर काही तासातच ईडीने नवाब मलिक यांच्या घरी धाड मारली.

हे वाचलं का?

नीरज गुंडे हा भाजपचा फ्रंटमॅन आहे असा आरोप काही दिवसांपूर्वी नवाब मलिकांनी केला होता. तेव्हापासून नीरज गुंडे हे चर्चेत आले होते. त्याच गुंडेनी आज एक असं ट्विट केलं आहे की, ज्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचवल्या आहेत. नीरज गुंडे यांनी या ट्विटमध्ये असं सूतोवाच केलं होतं की, महाराष्ट्राच्या एका राजकीय नेत्यावर ईडीची कारवाई होऊ शकते.

पाहा नीरज गुंडेंनी नेमकं काय ट्विट केलंय?

‘सूत्रांकडून मिळालेली माहिती: दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याने ईडीच्या कस्टडीत असताना महाराष्ट्रातील राजकारण्यांनी केलेल्या गुंतवणुकीचे बरेच तपशील दिले आहेत. तसेच दाऊद आणि छोटा शकीलच्या भारतातील आणि परदेशातील गुंतवणुकीचा तपशीलही दिला आहे.’ असं ट्विट नीरज गुंडे यांनी केलं आहे.

नीरज गुंडे यांच्या याच ट्विटनंतर आज पहाटे नवाब मलिक यांच्या घरी जाऊन ईडीने त्यांची चौकशी करण्यात आली. तसंच त्यांना ईडी कार्यालयात देखील नेण्यात आलं. आता अनेकांकडून असा सवाल विचारला जात आहे की. गोपनीय अशी समजली जाणारी माहिती निरज गुंडेंना आधीच कशी कळते? त्यामुळे आता नीरज गुंडे हे पुन्हा चर्चेत आले आहेत.

नीरज गुंडे नक्की आहेत तरी कोण?

संघ परिवारातील गुंडे

नीरज गुंडेबद्दल सांगायचे झालं तर नीरज गुंडे यांचे आजोबा मुंबईमधल्या शिवाजी पार्क परिसरात संघाचे संचालक होते. नीरज गुंडे यांच्या आत्या गीता गुंडे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्र सेविका समितीच्या पूर्ण वेळ कार्यकर्त्या आणि समन्वयाचे काम करायच्या. यामुळे संघ आणि भाजप परिवारातील अनेक नेत्यांशी गुंडे यांचे जवळचे संबंध आहेत असं बोललं जातं.

उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध

भाजपचे प्रसिद्ध नेते सुब्रामण्यम स्वामी आणि नीरज गुंडे यांचे जवळचे संबंध होते. सुब्रामण्यम स्वामी यांच्यासोबतच नीरज गुंडे हे पहिल्यांदा मातोश्रीवर पोचले होते. इथेच पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि नीरज गुंडे यांची ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले.

भाजप-शिवसेना युतीसाठी शिष्टाई

2019च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी शिवसेना-भाजप यांच्यामध्ये जेव्हा राजकीय धुसफूस सुरु होती. तेव्हा शिवसेना-भाजपमधला तणाव कमी करण्याचे काम आणि दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी करण्याचे काम नीरज गुंडे यांनी केले होते. 2018 मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती न करण्याची घोषणा केली होती, असं म्हटलं जातं की यानंतर गुंडे यांनी मध्यस्थी करुन ठाकरे-फडणवीस भेट घडवून आणली.

2019मध्ये मुंबईतल्या चेंबूर येथे नीरज गुंडे यांचे निवासस्थान आहे. याच निवासस्थाऩी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली होती. याच बैठकीत सेना-भाजप युतीचे सुतोवाच करण्यात आले होते. ठाकरे-फडणवीसांच्य़ा याच बैठकीनंतर भाजप अध्यक्ष अमित शहा हे मातोश्रीवर गेले आणि 2019च्या लोकसभा निवडणुकींच्या आधी भाजप शिवसेना यांच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

सेना-भाजप युतीच्या पडद्यामागचे कलाकार म्हणून नीरज गुंडे यांचे नाव घेतले जाते. 2019 च्या विधानसभा निवडणुकींनंतर जेव्हा भाजप आणि सेनेची युती फुटली तेव्हासुध्दा नीरज गुंडे यांनी युती पुन्हा यावी यासाठी मातोश्रीवर अनेक चकरा मारल्या पण तेव्हा नीरज गुंडे यांची शिष्टाई असफल ठरली आणि नंतर राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आले. नीरज गुंडे हे स्वत: व्यावसायिक असल्याचे सांगतात. तसेच ते आरटीआय कार्यकर्ते असल्याची माहिती देखील मिळते.

ईडीची टीम पहाटेच नवाब मलिकांच्या घरी धडकली, असं कोणतं प्रकरण ज्यासाठी ईडीने केली एवढी लगबग?

ट्विटरवर सक्रिय

क्रिकेट क्षेत्रातली भ्रष्टाचार आणि अनियमितता उघडकीला आणण्यात नीरज गुंडे यांचा सक्रिय सहभाग असायचा. भाजप खासदार सुब्रामण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकांमध्ये नीरज गुंडे यांचे नाव आढळते. ते आपल्या ट्विटर हॅंडलवरुन ते ईडी अधिकारी, गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करुन विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या चौकशीची मागणी करत असतात.

सध्या नीरज गुंडे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध सलोख्याचे नसल्याची माहिती मिळते. सध्या राज्यात वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ED ची कारवाई चालू आहे त्यांची माहिती नीरज गुंडे स्वत:च्या ट्विटर अकाऊटवरुन देत असतात. याच नीरज गुंडे यांचे नाव नवाब मलिकांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

    follow whatsapp