Jitendra Awhad : माझी अटक सरकारचा कट, कारवाईचं मनापासून स्वागत; जामीनही घेणार नाही

मुंबई तक

• 10:43 AM • 11 Nov 2022

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केलं आहे. चार दिवसांपूर्वी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडताना ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन कारवाई केल्याची माहिती आहे. याबाबत स्वतः आव्हाड यांनी पोस्ट करुन माहिती दिली. यात त्यांनी आपल्याला अटक केलं असल्याचं म्हटलं आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र […]

Mumbaitak
follow google news

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केलं आहे. चार दिवसांपूर्वी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडताना ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन कारवाई केल्याची माहिती आहे. याबाबत स्वतः आव्हाड यांनी पोस्ट करुन माहिती दिली. यात त्यांनी आपल्याला अटक केलं असल्याचं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

यानंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आपण या अटकेचं मनापासून स्वागत करत असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, आज दुपारी 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला. नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.

मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. पण यात DCP राठोड यांची काही चुकी नाही. हे पोलिसी राज आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला.

आव्हाड पुढे म्हणाले, हर हर महादेव चित्रपट ज्यात इतिहासाचे विकृतीकरण झाले. शिवाजी महाराजांची बदनामी झाली, मराठा समाजाची बदनामी झालीय. त्या चित्रपटावर मी आक्षेप घेतल्यामुळे माझ्यावर कारवाई होत असेल तर मी शिवाजी महाराजांचा प्रचंड मोठा रक्षक आहे, अभ्यासक आहे आणि मला हे सरकार रोखू इच्छित आहे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगण्यापासून, याचा मला प्रचंड आनंद आहे.

शिवाजी महाराजांचा अनऐतिहासिक चित्रपटाचा विरोध केल्यामुळे जर माझ्यावर कारवाई होत असेल तर मी स्वतः तुरुंगात जाऊन बसेन. घरी जेवायचं ते जेलमध्ये जेऊ. मी जामीन मागणार नाही आणि घेणार सुद्धा नाही. या अटकेच मी मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्राला पोलिसराजची ओळख माझ्या अटकेमुळे होईल,असंही आव्हाड म्हणाले.

हा सरकारचा कट :

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्यावरील अटकेची कारवाई हा सरकारचा कट असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ओरीजनल एफआयरमधील सर्व कलम हे जामीनपात्र आहेत. पण आम्हाला अडकवायचं, त्यामुळे एक विशेष कलम शोधून आणलं. हा संपूर्णतः कट रचण्यात आला आहे. सरकारने हा कट रचला आहे.

पोलीस हतबल आहेत. आता प्रत्येक पोलीस स्टेशनच्या बाहेर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असा बोर्ड लावणार आहे. माझा आरोप कोणावर आहे हे महाराष्ट्राला दोन मिनिटात कळलं आहे. पण जितेंद्र आव्हाडचा आवाज दाबणं कोणाला परवडणार नाही. पक्षाचीही मदत घेणार नाही. मला माहित आहे कसं लढायचं, असंही आव्हाड म्हणाले.

    follow whatsapp