Kalyan Crime News : कल्याणमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार आणि खून केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात संतापाची लाट पसरली असून, आज नागरिकांनी तोंडावर काळ्या फिती लावून मोर्चा काढत निषेध नोंदवला. बदलापूरच्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदेप्रमाणेच या आरोपीलाही धडा शिकवावा अशी मागणी केली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला बुलढाण्याच्या शेगाव येथून अटक केली आहे.
ADVERTISEMENT
कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात राहणारी 13 वर्षीय मुलगी सोमवारी सकाळी काही खाद्यपदार्थ घेण्यासाठी आईकडून वीस रुपये घेऊन दुकानात गेली. पण ती घरी परतलीच नाही. आठ-नऊ तास होऊनही मुलगी घरी न आल्यानं पीडितेच्या कुटुंबीयांनी कल्याणमधील कोळशेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. कोळशेवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाच दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी कल्याणजवळच्या भिवंडी परिसरात बापगावमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. कोळसेवाडी पोलिसांनाही याची माहिती मिळाली. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या वडिलांसह बापगाव गाठलं. अल्पवयीन मुलीचा मृतदेह तिच्या वडिलांना दाखवला असता वडिलांनी ती आपलीच मुलगी असल्याचं सांगितलं. मुलीच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिची हत्या कशी करण्यात आली, याची माहिती समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
हे ही वाचा >> Jacqueline Fernandez च्या नावानं सुकेश चंद्रशेखरचं तुरूंगातून पत्र, ख्रिस्तमसनिमित्त थेट द्राक्ष बाग भेट...
दोन जणांनी आपल्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करण्यासाठी पोलिसांनी 5 पथकं तयार केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत लोकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वीही याच मुलीच्या विनयभंगाची घटना घडली होती, त्यावेळी कोळसेवाडी पोलिसांनी याबाबत कारवाई केली होती, मात्र या मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या प्रकरणात आधीच्या घटनेशी संबंधित लोकांचा समावेश आहे का? याचाही तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा >> Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे येण्यास सुरूवात, नव्यानं नाव नोंदणी केलेल्या बहिणींसाठीही आनंदाची बातमी
दरम्यान, या प्रकरणात दोन आरोपींची नावं समोर आली आहेत. मुख्य आरोपी विशाल गवळी आणि गुन्ह्यात मदत करणाऱ्या आरोपीच्या पत्नीला बुलढाण्यातील शेगावमधून अटक करण्यात आली आहे. आरोपींवर यापूर्वीच 5 गुन्हे दाखल आहेत. आरोपी विशाल गवळीची ही तिसरी पत्नी असून, त्याच्या आधीच्या दोन पत्नी विशालला सोडून गेल्या होत्या.
याबाबत बोलताना स्थानिकांनी संताप व्यक्क केला आहे. माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आरोपीने यापूर्वीही असे चार ते पाच गुन्हे केले आहेत. नेत्यांच्या ताकदीमुळे तो सुटतो, पण त्याला फाशी द्या अशी मागणी जनतेने केली आहे.
ADVERTISEMENT
