ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी दुपारी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. सोमवारी (७ नोव्हेंबर) हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडताना ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन कारवाई केली. याबाबत स्वतः आव्हाड यांनी पोस्ट करुन माहिती दिली. यात त्यांनी आपल्याला अटक केलं असल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
जितेंद्र आव्हाड यांना अटक होताचं आरोप प्रत्यारोपांचं राजकारण तापलं आहे. आव्हाड यांच्या अटकेचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला. तर भाजप आणि मनसेने ही कारवाई योग्य असल्याचं म्हटलं आहे. अशातच या प्रकरणात आता अभिनेत्री केतकी चितळेची एन्ट्री झाली आहे. आव्हाड यांच्यावर विनयभंगाचाही गुन्हा दाखल करावा अशी मागणी केतकी चितळेने केली आहे. तिच्यावतीने आज वर्तकनगर पोलीस स्टेशनला पत्र देण्यात आलं आहे.
काय म्हटलं आहे केतकी चितळेने?
केतकी चितळे हिने वकिलांमार्फत दिलेल्या नोटीसीमध्ये म्हटलं की, जितेंद्र आव्हाड यांच्यावर लावण्यात आलेली कलम पुरेशी नाहीत. त्यांच्यावर कलम ३५४ हेही लावण्यात यावं. कारण ज्या परिक्षित धुर्वें यांना मारहाण केली त्यांच्या पत्नी देखील तिथं होत्या. त्यांनाही कार्यकर्त्यांनी मारहाण केली.
तसंच आव्हाड यांच्यावर १२० ब हे कलम देखील लावण्यात यावं. कारण हे सगळं नियोजनबद्ध करण्यात आलं आहे. जर वर्तकनगर पोलिसांनी ही कलम लावण्यात आली नाहीत तर आपण उच्च न्यायालयात दाद मागून ही कलम पोलिसांना वाढवायला लाऊ, असंही केतकी चितळेंच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
जितेंद्र आव्हाड विरुद्ध केतकी चितळे वाद :
काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड विरुद्ध केतकी चितळे वाद महाराष्ट्रभर गाजला होता. केतकीने शरद पवारांविषयी वादग्रस्त पोस्ट शेअर केल्या प्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. त्यानंतर ती अनेक दिवस कोठडीत होती. अशात आता केतकी चितळेला शरद पवार यांनी माफ केलं पाहिजे. शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत. त्यांनी हे प्रकरण सोडून दिलं पाहिजे असं काही जणांनी म्हटलं होतं. यावर जितेंद्र आव्हाड यांनी अशी मागणी करणाऱ्यांना खडे बोल सुनावले होते.
ADVERTISEMENT











