Sunil Prabhu: ‘…तर तुमच्यावर संविधानानुसार कारवाई करू’; बंडखोर आमदारांना इशारा!

मुंबई तक

• 08:53 AM • 22 Jun 2022

पक्षाचे निष्ठावंत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला भगदाडच पाडलं आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता शिवसेनेनं व्हीप जारी केला असून, आज सायंकाळी ५ वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. पक्षाविरुद्ध बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा केला आहे. […]

Mumbaitak
follow google news

पक्षाचे निष्ठावंत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला भगदाडच पाडलं आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता शिवसेनेनं व्हीप जारी केला असून, आज सायंकाळी ५ वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

हे वाचलं का?

पक्षाविरुद्ध बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर शिवसेनेनं आता महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. शिवसेनेनं सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे.

एकनाथ शिंदेंच्या गटातून दुसरा आमदार निसटला; मी उद्धव ठाकरेंचाच म्हणत केले गंभीर आरोप

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे विधीमंडळाचे मुख्य प्रनोत सुनिल प्रभू यांनी व्हीप जारी केला आहे. या पत्रात म्हटलं आहे की, “पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी २२ जून रोजी वर्षा बंगला, येथे ५ वाजता तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस उपस्थित राहणं आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी.”

“या बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वच्छेने शिवसेनेचं सदस्यत्व सोडायचा इरादा आहे, असं मानलं जाईल. परिणामी तुमच्यावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात असलेल्या तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल,” असा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातही ‘खेला होबे’! गोवा ते बिहार… आतापर्यंत कुठे कुठे झालंय ‘ऑपरेशन लोटस’?

विधान परिषद निवडणूक निकालाच्या रात्रीच महाराष्ट्रात राजकीय खेळ रंगला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी नाराजीचा सूर लावत पक्षालाच खिंडार पाडलं आहे. सध्या एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसह गुवाहाटी येथे आहेत. त्यांच्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४६ आमदार असल्याच्या वृत्ताने राज्यात राजकीय अस्थिरता वाढली आहे. सरकारच्या अल्पमतात येण्याच्या शक्यता दाट झाली आहे. एकाच वेळी अचानक पक्षाचे आमदार शिंदेंच्या मागे गेल्यानं शिवसेनेकडून वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी केली जात आहे.

‘सत्ता जाईल, आणखी काय होईल’; एकनाथ शिंदेंशी तासभर बोलल्यानंतर संजय राऊत काय म्हणाले?

पक्षासोबत असलेल्या आमदारांसोबतची चाचपणी करण्यासाठी शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आला असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेनं जारी करण्यात आलेल्या व्हीपचा बंडखोर आमदारांवर किती परिणाम होतो, हे सायंकाळच्या बैठकीत दिसून येईल.

    follow whatsapp