अनेकदा इशारा देऊनही भिवंडी-ठाणे रस्त्यावर असलेले खड्डे बुजवण्यात आले नाहीत. एवढंच नाही तर टोल वसुलीही होत असल्याने मनसेने खळ्ळ खटॅक करत भिवंडी-ठाणे रस्त्यावरचा टोल नाका फोडला. यावेळी मनसेने राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. या तोडफोडीचा व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
भिवंडी-ठाणे रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवले जावेत , अन्यथा टोल नाका तोडून टाकण्यात येईल असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. हा इशारा देऊनही रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले नाही. म्हणूनच संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केल्याचे मनसेने सांगितले आहे.
मनसेचे ठाणे जिल्ह्याचे सचिव संजय पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. भिवंडी-ठाणे रोडवरील कशेळी येथे हा टोला नाका आहे. पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बॅट आणि लाकडी दांडक्यांच्या सहाय्याने टोल नाक्याच्या काचा फोडल्या.
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे यांच्या नेतृत्वात काही दिवसांपूर्लीच याच कशेळी टोल नाक्यावर मुंडण आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे आवाहन करण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या आधी हे खड्डे बुजवण्यात यावेत अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यावेळी मनसेने दिला होता.
भिवंडी-ठाणे हा महामार्ग नेहमीच वाहनांनी गजबजलेला असतो. या महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. येथील टोल कंपनी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मार्गाकडे सपशेल दुर्लक्ष केलेले आहे. मनसेने या मार्गासाठी अनेकदा आंदोलने केली आहेत. मात्र या मार्गाकडे नेहमीच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. आमच्या आंदोलनांची दखल ना टोल कंपनीने घेतली, ना सार्वजनिक बांधकाम विभागाने. यामुळेच आम्ही आज हा टोलनाका फोडला, अशी प्रतिक्रिया मनसेचे जिल्हा सचिव संजय पाटील यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
