पुणे : येथील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. सातारहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कंटेनरने रस्त्यावरील इतर वाहनांना धडक दिल्याने तब्बल 30 वाहनांचा चक्काचूर झाला आहे तर 18 वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार अपघातात 35 ते 40 जण जखमी झाले असून यातील 7 ते 8 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT
दरम्यान, काल प्राथमिक माहितीनुसार कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचं सांगितलं गेलं होतं. मात्र हा अपघात ब्रेक फेल झाल्याने नाही तर उतारावर न्यूट्रल केल्याने झाल्याचं समोर आलं आहे.
याबाबत बोलताना पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर म्हणाले की, नवले ब्रिज येथे काल रात्री तांदुळाने भरलेल्या ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घटनेनंतर आरोपी पळून गेला आहे. त्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
तसंच उतारावरून येताना ट्रक चालकाने गाडी न्यूट्रल केली. त्यामुळे गाडीचा अधिक वेग निर्माण झाल्याने, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला आहे. आजपर्यंत अपघाताच्या घटना लक्षात घेता, बाहेरून येणार्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने विशेष उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळेंची घटनास्थळाला भेट :
या घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, कात्रज बोगदा ते नवले ब्रिज पर्यंत क्रोनिक पॉईंट झाले आहेत.
तसेच रस्त्याला प्रचंड उतार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्त आणि संबधित अधिकारी वर्गासोबत आज बैठक होणार आहेत. त्यामध्ये या रस्त्यावरील अपघाताबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना नोट करून देण्यात येणार आहे. या रस्त्यावर झिरोवर अपघात आले पाहिजे. यावर विशेष उपाय योजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर, खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, पुणे महापालिकेचे अतिरिक्त कुणाल खेमणार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक आणि राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी संजय कदम, वाहतूक पोलिस उपायुक्त विजय कुमार मगर यांच्यासह अधिकारी वर्गाने घटनास्थळी भेट देऊन चर्चा केली.
ADVERTISEMENT











