महत्त्वाची बातमी! पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्यासंदर्भात ठाकरे सरकारने घेतला निर्णय

मुंबई तक

• 10:58 AM • 13 Oct 2021

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मदत देण्याबरोबरच पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहे. पदोन्नती आरक्षणासंदर्भातील विशेष अनुमती याचिका क्र. 28306/2017 सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ठ असून, शासनाची बाजू मांडण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. मागासवर्गीयांची पदोन्नती व सरळ सेवेतील प्रतिनिधित्वाची माहिती […]

Mumbaitak
follow google news

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मदत देण्याबरोबरच पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहे.

हे वाचलं का?

पदोन्नती आरक्षणासंदर्भातील विशेष अनुमती याचिका क्र. 28306/2017 सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ठ असून, शासनाची बाजू मांडण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे.

मागासवर्गीयांची पदोन्नती व सरळ सेवेतील प्रतिनिधित्वाची माहिती संकलित करून त्यांचे शासन सेवेतील आरक्षण निश्चित करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेल्या अहवालावर देखील आज चर्चा करण्यात आली. यासंदर्भात मंत्रिमंडळाने काही निर्णय घेतले आहेत.

१) राज्यघटनेच्या अनुच्छेद 16 (4) (ए) द्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे पदोन्नतीमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही असे राज्याचे मत असल्यास अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देता येईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाने विहित केलेल्या अपुरे प्रतिनिधित्व व प्रशासकीय कार्यक्षमता या दोन निकषांची पूर्तता होत असल्यामुळे राज्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देता येईल.

२) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रमाणेच विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती(क), भटक्या जमाती(ड) व विशेष मागास प्रवर्ग यांचे देखील पदोन्नतीमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही, असे उक्त समितीच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे विमुक्त जाती(अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती(क), भटक्या जमाती(ड) व विशेष मागास प्रवर्ग यांनादेखील पदोन्नतीमध्ये आरक्षण देणे आवश्यक आहे.

त्या अनुषंगाने महाराष्ट्र आरक्षण अधिनियम 2001 प्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती(अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड) व विशेष मागास प्रवर्ग यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात आले आहे. ते कायम ठेवण्यात यावे, असे मत सर्वोच्च न्यायालयातील याचिकेमध्ये राज्यातर्फे मांडण्यात येणार आहे.

३) वरील बाबी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्यात येणार आहे.

४) या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी आवश्यकतेनुसार ज्येष्ठ विधिज्ञांची विशेष समुपदेशी म्हणून नियुक्ती करण्यात यावी, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

    follow whatsapp