मोहिते पाटील पॅटर्न, राम सातपुतेंचा सुपडा साफ, सोलापुरातील 5 नगरपालिकांमध्ये भाजपचे कमळ कोमेजले

Solapur Politics : अकलूज नगरपरिषदेत हा विजय अधिक ठळकपणे दिसून आला. एकूण 13 प्रभाग आणि 26 उमेदवारांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि मोहिते पाटील गटाने अक्षरशः भाजपचा सुपडा साफ केला. 26 पैकी तब्बल 22 उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजयी झाले, तर भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले.

Solapur Politic

Solapur Politic

मुंबई तक

• 03:27 PM • 21 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मोहिते पाटील पॅटर्न, राम सातपुतेंचा सुपडा साफ

point

सोलापुरातील 5 नगरपालिकांमध्ये भाजपचे कमळ कोमेजले

Solapur Politics : सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अकलूज नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार राम सातपुते यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, माढा लोकसभा मतदारसंघातील तब्बल पाच नगरपालिकांमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. दुसरीकडे, मोहिते पाटील गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनी ‘मोहिते पाटील पॅटर्न’ दाखवत जिल्ह्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

हे वाचलं का?

अकलूज नगरपरिषदेत हा विजय अधिक ठळकपणे दिसून आला. एकूण 13 प्रभाग आणि 26 उमेदवारांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि मोहिते पाटील गटाने अक्षरशः भाजपचा सुपडा साफ केला. 26 पैकी तब्बल 22 उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजयी झाले, तर भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रेश्मा आडगळे यांनी भाजपच्या पूजा कोथमीरे यांचा 2,739 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे ‘मोहिते पाटलांच्या पट्ट्यात कमळ कोमेजले’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा : रावसाहेब दानवेंना मोठा झटका, भोकरदनच्या नगरपालिकेत पराभव, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा दानवेंच्या घरासमोर जल्लोष

या पराभवाचा सर्वात मोठा फटका माजी आमदार राम सातपुते यांना बसल्याचे मानले जात आहे. अकलूज ही राम सातपुते यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढत होती. मात्र, मतदारांनी भाजपचा अति आत्मविश्वास नाकारत मोहिते पाटील गटाच्या नेतृत्वावर विश्वास टाकला. त्यामुळे राम सातपुते यांचा राजकीय प्रभाव या निकालामुळे कमकुवत झाल्याचे चित्र आहे.

अकलूजप्रमाणेच करमाळा, कुर्डूवाडी, सांगोला आणि मंगळवेढा या नगरपालिकांमध्येही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. विशेषतः सांगोल्यात शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्ष निवडून आला असला, तरी या विजयामागे मोहिते पाटील गटाची अप्रत्यक्ष साथ असल्याची जोरदार चर्चा आहे. आमदार शहाजी बापू पाटील यांना मोहिते पाटील यांचे पाठबळ लाभल्याने येथेही ‘मोहिते पाटील पॅटर्न’च दिसून आल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

माढा लोकसभा मतदारसंघातील अकलूज, करमाळा, कुर्डूवाडी आणि सांगोला या चारही नगरपालिकांवर थेट किंवा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटील गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. याशिवाय पंढरपूर नगरपालिकाही भाजपकडून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांवर पुन्हा एकदा मोहिते पाटील गटाची पकड मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या ‘मिशन लोटस’लाही या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. भाजपने जिल्ह्यात मोठ्या अपेक्षेने निवडणूक लढवली होती. मात्र, अति आत्मविश्वास, स्थानिक नेत्यांतील विसंवाद आणि विरोधकांची मजबूत रणनीती यामुळे भाजपला पराभव स्वीकारावा लागला. एकूणच, सोलापूर जिल्ह्यातील या नगरपालिकांच्या निकालांनी जिल्ह्याच्या राजकारणात नवा संदेश दिला असून, ‘मोहिते पाटील पॅटर्न’ अजूनही तितकाच प्रभावी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा हादरा, नेतृत्वात लढलेल्या सर्व नगरपालिका निवडणुकांमध्ये सुपडा साफ

    follow whatsapp