नाईट कर्फ्यूच्या नावाखाली हॉटेल्स बंद करणं हा अन्याय, संजय निरूपम यांची ठाकरे सरकारवर टीका

नाईट कर्फ्यूच्या नावाखाली हॉटेल्स बंद ठेवणं हा हॉटेल मालकांवर केलेला अन्याय आहे अशी टीका काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केली आहे. ‘मला ठाऊक नाही की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रात्री जास्त वेगाने होतो की दिवसा? रात्री ८ ते ११ या वेळेत हॉटेल्स बंद ठेवणं म्हणजे त्यांची रोजी-रोटी हिरावून घेणं आहे. बिअर बार, पब, नाईट क्लब बंद […]

Mumbai Tak

विद्या

• 02:39 PM • 01 Apr 2021

follow google news

नाईट कर्फ्यूच्या नावाखाली हॉटेल्स बंद ठेवणं हा हॉटेल मालकांवर केलेला अन्याय आहे अशी टीका काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केली आहे. ‘मला ठाऊक नाही की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रात्री जास्त वेगाने होतो की दिवसा? रात्री ८ ते ११ या वेळेत हॉटेल्स बंद ठेवणं म्हणजे त्यांची रोजी-रोटी हिरावून घेणं आहे. बिअर बार, पब, नाईट क्लब बंद करा काही हरकत नाही. पण जी सामान्य हॉटेल्स आहेत त्यांचा व्यवसाय हा ८ ते ११ या वेळेतच होतो. ती हॉटेल्सही नाईट कर्फ्यूच्या नावाखाली बंद करणं हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यांनी आपलं पोट कसं भरायचं?’ असाही प्रश्न संजय निरूपम यांनी उपस्थित केला आहे.

हे वाचलं का?

मुंबईत लॉकडाऊन होणार का? BMC आयुक्त चहल यांची Exclusive मुलाखत

आज दुपारी काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी रेस्तराँ आणि हॉटेल मालकांनी जे आंदोलन केलं त्याला साथ दिली. ओशिवरा पोलीस स्टेशनजवळ हे आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस हादेखील महाविकास आघाडीचा घटक आहे मात्र तरीही संजय निरूपम यांनी हॉटेल आणि रेस्तराँच्या मालकांना साथ देत महाविकास आघाडी सरकारवर दुसऱ्या लॉकडाऊन लावण्याच्या प्रस्तावावरून टीका केली. मागच्या वर्षी जो लॉकडाऊन लावण्यात आला त्यामध्ये या सामान्य हॉटेल व्यावसायिकांचं कंबरडं मोडलं आहे. आता पुन्हा तशीच वेळ त्यांच्यावर आणू नका. कोरोनाशी आपल्याला लढायचं आहे ही बाब कुणीही अमान्य करत नाही. मात्र हॉटेल्स बंद केली तर त्या व्यावसायिकांवर उपाशी मरायची वेळ येईल ही बाब सरकार लक्षात का घेत नाही? असाही प्रश्न संजय निरूपम यांनी विचारला आहे.

हॉटेल व्यावसायिकांनी आज नो लॉकडाऊन प्लीज, रात्री ८ नंतर हॉटेल बंद म्हणजे आमचा व्यवसाय बंद, जीएंगे तो कोरोनासे लडेंगे असे संदेश लिहिलेले फलक घेऊन आंदोलन केलं. या आंदोलनात काँग्रेस नेते संजय निरूपम आणि काही काँग्रेस कार्यकर्त्यांचाही सहभाग होता.

मुद्दा हाच आहे कोरोनाशी लढणं आवश्यक पण विविध प्रकारचे निर्बंध लादले जात आहेत त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांचे व्यवसाय ठप्प होतील, बेरोजगारी वाढेल आणि लोकांवर उपासमारीची वेळ येईल ही बाब सरकारने आधी लक्षात घेतली पाहिजे असंही यावेळी संजय निरूपम यांनी म्हटलं आहे. नाईट कर्फ्यू आणि रात्री ८ नंतर हॉटेल्स बंद करण्याचे निर्बंध लादल्याने आमचं ६० ते ७० टक्के नुकसान होतं आहे अशी तक्रारही यावेळी हॉटेल आणि रेस्तराँच्या मालकांनी बोलून दाखवली.

लॉकडाऊन लागलं आणि नाट्यगृहं बंद झाली तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू – भरत जाधव

रेस्तराँच्या मालकांनी काय म्हटलं आहे?

जोगेश्वरी येथे रेस्तराँ चालवणारे युनूस खान म्हणतात, ‘माझ्या रेस्तराँमध्ये येणारे अनेक ग्राहक हे बॅचलर्स असतात. ते त्यांचं काम संपवून माझ्या हॉटेलमध्ये रात्री ८-९ च्या दरम्यान येतात. मात्र आता निर्बंध लादल्याने माझा ६० टक्के व्यवसाय बुडाला आहे. ८ वाजता पोलीस येतात आणि रेस्तराँ बंद करायला सांगतात. त्यांनी पार्सल सेवाही सुरू ठेवण्यास संमती दिलेली नाही. त्यामुळे आता मला माझ्या रेस्तराँचं भाडं भरण्यासही अडचण येते आहे. तसंच माझ्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार कसा द्यायचा असाही प्रश्न मला भेडसावतो आहे.’

ओशिवारा भागातलं गुड लक रेस्तराँ चालवणारे सोहराबुद्दीन म्हणतात, ‘दिवसा माझ्या रेस्तराँमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या रात्रीच्या तुलनेत कमी आहे. बहुतांश लोक रात्री ९ नंतर येतात. मात्र पोलीस आता रोज ८ वाजता रेस्तराँ बंद करायला सांगतात. रस्त्याच्या कडेला लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्या रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. मग रेस्तराँ बंद का? हा कोणता कायदा आहे? माझा व्यवसाय आता फक्त ३० टक्के होतो आहे. मला ७० टक्के तोटा सहन करावा लागतो आहे. हा कोणत्या प्रकारचा कोरोना व्हायरस आहे जो फक्त रात्रीच वेगाने प्रसार करतो?’

ओशिवारा भागात ला हबीबी नावाचं कॅफे चालवणारे ललित भोजवानी म्हणतात, नाईट कर्फ्यूमुळे आमचा इतकाही व्यवसाय होत नाही की आम्ही आमच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकू.. तसंच आमचं वीज बिलही भरू शकण्याइतके पैसे उरत नाहीत. आता सरकार दुसऱ्या लॉकडाऊनची धमकी देतं आहे. त्यामुळे माझ्याकडे काम करणाऱ्यांना सुट्टी हवी आहे. गेल्यावेळी जसे लोकांचे हाल झाले तसे त्यांना यावेळी करून घ्यायचे नाहीत. मग आता सरकारनेच सांगावं की मी माझा व्यवसाय कसा करावा?’