Ranveer Singh : 'डॉन 3' या अत्यंत बहुप्रतिक्षित चित्रपटातून अभिनेता रणवीर सिंगने अचानक बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे चित्रपटसृष्टीत नवा वादंग निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे झालेले आर्थिक नुकसान लक्षात घेता, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) रणवीर सिंगविरुद्ध बंदीचा ठराव मंजूर केला आहे. फेडरेशनने संपूर्ण चित्रपटसृष्टीला रणवीर सिंगसोबत काम न करण्याचे निर्देश दिले आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : बायकोला प्रेयसीच्या घरी नेलं, अन् सासऱ्यांना सांगितली 'ती' गोष्ट, भयंकर कांड उघडकीस
निर्मात्यांकडून 40 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी
फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटने, रणवीर सिंगने शूटिंग सुरू होण्यापूर्वी केवळ 10 दिवस आधी प्रकल्प सोडून निर्मात्यांचे मोठे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप केला आहे. निर्मात्यांनी 40 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली असून, रणवीरने अद्याप ती भरलेली नाही. दुसरीकडे, रणवीर सिंगचे म्हणणे आहे की, निर्मात्यांच्या बाजूने कामात विलंब होत होता आणि तो स्क्रिप्टवरही समाधानी नव्हता.
हेही वाचा : तरुणीशी शरीरसंबंध ठेवत बनवले अश्लील व्हिडिओ, ब्लॅकमेल करत.. लाज आणणारी घटना
रणवीर सिंगने दिली पहिली प्रतिक्रिया
या वादावर प्रतिक्रिया देताना रणवीर सिंगच्या प्रवक्त्यांनी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, रणवीर सिंग चित्रपटसृष्टीचा आणि 'डॉन' फ्रँचायझीशी संबंधित सर्वांचा अत्यंत आदर करतो. या प्रकरणावर कोणतेही तर्क-वितर्क किंवा अफवांना उत्तर देण्यापेक्षा व्यावसायिक सन्मान आणि प्रतिष्ठेने वागणे त्याला योग्य वाटते. "अनेक चर्चा आणि तर्क-वितर्क समोर आले असले तरी, रणवीरने कधीही सार्वजनिकरीत्या प्रतिक्रिया देणे आवश्यक मानले नाही. त्याचे संपूर्ण लक्ष आता त्याच्या आगामी कामावर आणि प्रकल्पांवर आहे. तो 'डॉन' फ्रँचायझीच्या यशासाठी सदिच्छा व्यक्त करतो," असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, फेडरेशनचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले असून, शूटिंगच्या ऐन वेळी कलाकाराने चित्रपट सोडणे हे उद्योगासाठी घातक असल्याचे मत व्यक्त केले आहे. गेल्या काही वर्षांपासून 'डॉन 3' हा चित्रपट विलंब आणि कास्टिंगमधील बदलांमुळे चर्चेत असून, आता रणवीरवरील या बंदीमुळे या प्रकल्पाचे भविष्य पुन्हा एकदा टांगणीला लागले आहे.
ADVERTISEMENT











