उस्मानाबाद : जिल्ह्यातील सारोळा गावातील सात शेतकऱ्यांनी जमिनीत खड्डे काढून स्वतःला गाडून घेतले आहे. सर्वोच्च न्यायायलयाच्या आदेशांप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विमा, अतिवृष्टी व नुकसान भरपाईचे पैसे मिळावे यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
ADVERTISEMENT
या उपोषणाचा आज चौथा दिवस असून आमदार पाटील यांना पाठिंबा म्हणून शेतकऱ्यांनी ही कृती केली आहे. शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याने त्यांना दिवाळी साजरी करता आली नाही. त्यामुळे जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
याशिवाय या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज NH 52 वरील आळणी फाटा चौक येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी बांधवांनी हजारोच्या संख्येने सहभागी होऊन रस्तारोको आंदोलन केले.
सुषमा अंधारेंचा कैलास पाटील यांना पाठिंबा :
दरम्यान, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी रात्री आमदार कैलास पाटील यांची भेट घेतली. .यावेळी सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, शेतकऱ्यांना पीक विमा आणि अनुदानाचे पैसे मिळावे या मागणीसाठी आमदार कैलास पाटील उपोषण करत आहेत आणि दिवाळी सणात आमरण उपोषण करावे लागते आहे हे क्लेशदायक आहे. बहीण म्हणून त्यांची पाठराखण करणे करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. हा लढा राज्यातील शेतकऱ्यांचा आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात विमा कंपनी व सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची 1 हजार 200 कोटी रुपये रक्कम थकीत आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली होती, ती मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार ते मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण बसले आहेत.
कैलास पाटील यांच्या मागण्या :
-
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सन 2020 च्या पिक विम्याची 531 कोटी रक्कम जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावी.
-
ही रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करताना शेतकरी संख्या बाधित क्षेत्र आणि नुकसान भरपाईच्या विमा रकमेत कोणतीही छुपी कपात करू नये.
-
सन 2020-21 च्या पीक विम्याची उर्वरित 50 टक्के म्हणजेच 388 कोटी रुपये विमा पात्र सहा लाख 67 हजार 287 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावे.
-
सप्टेंबर 2022 मधील सततचा पाऊस व अतिवृष्टी डगफुटी रोगराईमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 248 कोटी रुपये दोन लाख 48 हजार 801 शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे.
-
चालू खरीप हंगामात सततचा पाऊस अतिवृष्टी ढगफुटी पिकावरील रोगराईमुळे संपूर्ण पिके आणि शेतकरी उध्वस्त झाला आहे, त्यामुळे सरसकट दुष्काळ जाहीर करावा आणि पीडित शेतकऱ्यांना जीवघेण्या आर्थिक संकटातून दिलासा द्यावा. अशा काही मागण्या आमदार पाटील यांनी केल्या आहेत.
ADVERTISEMENT











