महाराष्ट्रातली पर्यटनस्थळं पुन्हा सुरू होणार, ठाकरे सरकारने आणली नवी नियमावली

मुंबई तक

• 04:27 AM • 01 Feb 2022

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या दोन लाटांवर नियंत्रण मिळवल्यानंतर आता तिसरी लाट ओसरली आहे. राज्यातला कोरोना संसर्ग आता कमी झाला आहे. संसर्ग नियंत्रणात असल्याची माहिती टास्क फोर्सने दिली आहे. त्यामुळे राज्यातले निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आजपासून 1 फेब्रुवारी 2022 पासून सगळी पर्यटनस्थळं, राष्ट्रीय उद्यानं, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या दोन लाटांवर नियंत्रण मिळवल्यानंतर आता तिसरी लाट ओसरली आहे. राज्यातला कोरोना संसर्ग आता कमी झाला आहे. संसर्ग नियंत्रणात असल्याची माहिती टास्क फोर्सने दिली आहे. त्यामुळे राज्यातले निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आजपासून 1 फेब्रुवारी 2022 पासून सगळी पर्यटनस्थळं, राष्ट्रीय उद्यानं, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचलं का?

नव्या नियमावलीनुसार राष्ट्रीय उद्यानं, सफारी, सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम किंवा लग्न सोहळे यासाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीची संमती देण्यात आली आहे. अंत्यसंस्कारांसाठीच्या 20 व्यक्तींची मर्यादा हटवण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.

काय आहे राज्य सरकारची नवी नियमावली?

सर्व पर्यटनस्थळं नियमित वेळेवर सुरू होतील, ऑनलाईन तिकिट खरेदी करावी लागेल. तसंच फिरायला जाणाऱ्यांचं लसीकरण झालेलं असणं आवश्यक

स्पा, ब्युटी पार्लर, सलूनमध्ये 50 टक्के उपस्थिती

अंत्ययात्रेत उपस्थितीवर मर्यादा ठेवण्यात आलेल्या नाहीत

उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्रशासनाने केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेने

नॅशनल पार्क आणि जंगल सफारी आधीप्रमाणे निर्धारित वेळेवर सुरू होती. पर्यटकांनी मास्क लावणं आणि लसीचे दोन डोस घेतलेले असणं बंधनकारक

अम्युझमेंट पार्क, थीम पार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याची मुभा

सोमवारी राज्यात 15 हजार 140 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. 39 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे 35 हजार 453 रूग्ण होऊन बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 73 लाख 67 हजार 259 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात 2 लाख 7 हजार 350 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.42 टक्के आहे. तर मृत्यूदर 1.85 टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 46 लाख 29 हजार 449 नमुन्यांपैकी 10.35 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

ओमिक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. त्यानुसार मंगळवारपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अंत्यसंस्काराठी 20 व्यक्तींची मर्यदा हटविण्यात आली असून आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल.

    follow whatsapp