हॉटेलमध्ये भीषण आग, खिडकीतून उड्या अन् 21 जणांचा मृत्यू; नेमकं कारण काय?

दिल्लीतील एका हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 21 जणांचा मृत्यू झाला. तसेच 13 जण जखमी झाले. ही आग नेमकी का लागली? हॉटेल मालकाने सुरक्षेचं उल्लंघन केलं का? याविषयी आता चर्चा रंगली आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली जाणून घेऊया.

मुंबई तक

• 05:24 PM • 04 Jun 2026

follow google news

Delhi Hotel Fire : दिल्लीतील मालवीय नगर स्थित हॉटेल फ्लॉरिस स्टे मध्ये बुधवारी (दि.3) सकाळी लागलेल्या भीषण आगीमुळे एक मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली असून, अनेक लोक गंभीररित्या भाजले गेले आहेत. आग लागल्यानंतर हॉटेलमधील परिस्थिती अत्यंत भयावह झाली होती. आपला जीव वाचवण्यासाठी हॉटेलमध्ये अडकलेल्या काही लोकांनी इमारतीच्या वरच्या मजल्यांवरून खाली उड्या मारल्या, ज्यामुळे मृतांचा आकडा वाढला. आगीची तीव्रता इतकी होती की, काहींना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.

हे वाचलं का?

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. संयुक्त बचाव मोहिमेद्वारे सुमारे 40 हून अधिक लोकांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले, ज्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने या अपघाताची गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे. दरम्यान, हॉटेलमधील सुरक्षेच्या त्रुटींवरून मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हॉटेलमध्ये प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी केवळ एकच मुख्य दरवाजा असल्याने ही दुर्घटना भीषण रूप धारण करू शकली, असे प्राथमिक निरीक्षणातून समोर आले आहे.