महाराष्ट्रात नवा राजकीय भूकंप, ऐन रात्री ‘ऑपरेशन टायगर’ सुरू.. ठाकरेंचे खासदार थेट…

मुंबई तक

17 Jun 2026 (अपडेटेड: 17 Jun 2026, 12:44 PM)

Maharashtra Operation Tiger: ‘ऑपरेशन टायगर’ हे आता अंतिम टप्प्यात आलं असून ठाकरे गटाचे 6 ते 7 खासदार शिंदे यांच्या संपर्कात असून त्यापैकी काही जण दिल्लीसाठी रवानाही झाले आहेत.

Mumbai Tak
Google CTA

Shiv Sena Split News: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा रंगू लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून राबवण्यात येत असलेल्या "ऑपरेशन टायगर"ला आता नवे आणि अंतिम वळण मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे तब्बल सहा ते सात खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून त्यापैकी काही जण दिल्लीला रवानाही झाले आहेत. या नव्या राजकीय भूकंपामुळे राज्याच्या राजकारणात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

दिल्लीत वाढल्या हालचाली

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटातील काही खासदार सध्या दिल्लीत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आले असून पुढील काही तासांत महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः संसद अधिवेशन आणि आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंचे फुटलेले खासदार हे लवकरच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रही देण्याची शक्यता आहे.

कोणत्या खासदारांची नावे चर्चेत?

शिंदे गटात प्रवेश करण्याची चर्चा ज्या खासदारांबाबत सुरू आहे, त्यामध्ये ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, बंडू जाधव, नागेश आष्टीकर, संजय दिना पाटील आणि राजाभाऊ वाजे यांची नावे चर्चेत आहे.

मात्र या वृत्तांना अद्याप कोणत्याही संबंधित खासदारांकडून किंवा पक्षाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

'ऑपरेशन टायगर' नेमकं काय?

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याच्या उद्देशाने शिंदे गटाकडून विविध पातळ्यांवर आमदार आणि खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यालाच राजकीय वर्तुळात "ऑपरेशन टायगर" असे नाव देण्यात आले आहे. ठाकरे गटातील नाराज नेते आणि लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूने वळवण्याचा हा सगळा प्रयत्न सुरू आहे.

ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरणार?

जर चर्चेत असलेल्या सहा ते सात खासदारांनी प्रत्यक्षात शिंदे गटात प्रवेश केला, तर तो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षासाठी मोठा राजकीय धक्का मानला जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर ठाकरे गटाने आपली ताकद सिद्ध केली होती. अशा परिस्थितीत खासदारांची संभाव्य गळती पक्षासाठी चिंतेचा विषय ठरू शकते.

रात्रीतून मोठ्या घडामोडींची शक्यता

दिल्लीतील बैठका, वाढलेल्या राजकीय हालचाली आणि चर्चेत असलेली नावे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.