"तर मी राजकारण सोडेल राजकारण...", अंबानींबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावरुन काय म्हणाले अजित पवार?

मुंबई तक

• 09:43 AM • 17 Jun 2025

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवार यांनी धीरू भाई अंबानी यांच्या यशाची कहाणी सांगताना म्हटलं, “पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करून धीरू भाई अंबानी कोट्यधीश झाले.”

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अजित पवार यांच्या त्या वक्तव्याची चर्चा

point

काय म्हणाले होते अजित पवार?

point

चोरून नाही, सोडून... स्वत: स्पष्ट करून सांगितलं

Ajit Pawar on Dhirubhai Ambani : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते अजित पवार यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवार यांनी उद्योगपती धीरू भाई अंबानी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानं चर्चा झाली. या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेल्यानं खळबळ उडाली. या प्रकरणी पवार यांनी मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करत आपली बाजू मांडली आहे.

हे वाचलं का?

काय आहे प्रकरण?

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवार यांनी धीरू भाई अंबानी यांच्या यशाची कहाणी सांगताना म्हटलं, “पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करून धीरू भाई अंबानी कोट्यधीश झाले.” त्यांच्या या वक्तव्याचा उद्देश धीरू भाई अंबानी यांच्या मेहनती आणि कष्टाच्या प्रवासाला अधोरेखित करणं हा होता.

मात्र, सोशल मीडियावर त्यांच्या ‘सोडून’ या शब्दाचा ‘चोरून’ असा विपर्यास करत हे वक्तव्य व्हायरल झालं. यामुळे अजित पवार यांनी धीरू भाई अंबानी यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप होऊ लागला.

हे ही वाचा >> गिझर लिक झालं, नवविवाहित दाम्पत्याचा गुदमरून अंत? फोन लागत नाही म्हणून कुटुंबीय घरी आले तर...

या वादानंतर अजित पवार यांनी दुसऱ्या एका भाषणात आपली बाजू स्पष्ट केली. त्यांनी माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलं, “मीडियाने ‘ध’चा ‘म’ करून माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला. मी धीरूभाई अंबानी यांच्याबाबत ‘पेट्रोल सोडण्याचे काम’ असं म्हटलं होतं, ज्याचा अर्थ पेट्रोल पंपावर काम करणे असा आहे. पण काहींनी हा शब्द ‘चोरून’ असा पसरवला. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे.”

अजित पवार यांनी पुढे आव्हान देताना सांगितले, “जर मी खरोखर चुकीचा शब्द वापरला असेल, तर मी राजकारण सोडेन. माझ्या बोलण्याची रीत आणि मराठी भाषा सर्वांना माहिती आहे. मी असं काही बोलूच शकत नाही.”