बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी बड्या-बड्या लोकांनी जोरदार प्रयत्न केले मात्र, सुनेत्रा पवारांच्याविरोधात एक नाही दोन नाही तब्बल 22 उमेदवारांनी आव्हान कायम ठेवलंय. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनींसाठी ही निवडणूक बिनविरोध झालीच नाही. या निवडणुकीसाठी एकूण 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. यात काँग्रेसच्या आकाश मोरे यांचाही समावेश होता. मात्र, अद्यापही 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ठाम आहेत आणि आपापल्या परीने प्रचारही सुरु आहे.
ADVERTISEMENT
समजून घ्या बारामतीमधील निवडणुकीचं नेमकं गणित
इकडे सुनेत्रा पवारांसाठी संपूर्ण पवार कुटुंबासह भाजप आणि शिवसेनेनं देखील ताकद लावली आहे. बारामतीच्या रणधुमाळीत सुनेत्रा पवार निवडून येणार हे जवळजवळ निश्चित मानलं जातंय. असे असले तरी लोकशाहीत निवडणुक प्रक्रियेला मोठं स्थान आहे त्यामुळं निकाल लागेपर्यंत विजयावर शिक्कामोर्तब होत नसतं. अशातच इथे सुनेत्रा वहिनींसाठी वातावरण कसं आहे? कसे-कसे प्रयत्न त्यांच्या विजयासाठी केले जात आहेत. आणि खासकरुन सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतदानाच्या टक्केवारीसाठी काय प्लॅन्स आहेत, यासंदर्भात पोलपंडित या सर्व्हे करणाऱ्या संस्थेनं तिथं फिरुन काढलेली काही महत्त्वाची निरीक्षण आणि अंदाज आपण बघणार आहोत.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेस पक्षाने माघार घेतल्यामुळे निवडणूक एकतर्फी होणार हे जवळपास निश्चित आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून 22 उमेदवार आहेत. अजित पवारांनी जेव्हा 2024 ला निवडणूक लढवलेली तेव्हा त्यांच्याविरोधात 23 उमेदवार होते. आता सुनेत्रा पवारांसमोर करुणा मुंडे आणि अभिजित बिचुकले वगळता इतर अपक्ष उमेदवार हे अल्पपरिचित दिसून येतात.
हे ही वाचा>> Rahuri Bypoll Survey: एक फोन किंगमेकर! पण राहुरीतली टशन संपलेली नाही, तसं झालं तर गेम फिरणार!
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बारामतीमधील पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले आहे. शिवाय देवेंद्र फडणवीसांसह सर्व पक्षातील नेत्यांची उपस्थिती त्यांच्या सांगता सभेला राहिली. सुप्रिया सुळेंचं भाषण यात चर्चेचा विषय ठरला.
पवारांचे पारंपरिक विरोधक राहिलेले चंद्रराव तावरे यांचे सहकार्य मिळवण्यासाठी त्यांची रोहित पवार व जय पवार यांनी भेट घेतल्याचंही दिसून आलं. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे हे गाव निहायभेटी आणि प्रचार दौरे करत आहेत.
हे ही वाचा>> सुषमा अंधारेंची विधानपरिषदेसाठी रश्मी ठाकरेंकडे फिल्डिंग? मातोश्रीवर इच्छुकांची भाऊगर्दी, कोणाला मिळणार संधी?
जय पवार आणि आमदार रोहित पवार यांचे मतदारसंघात गावनिहाय दौरे सुरू असून स्थानिक नागरिकांना मतदानासाठी ते भावनिक साद घालताना दिसून येत आहेत. मागील काही दिवसांपासून शर्मिला पवार या प्रचारात सक्रीय झालेल्या दिसून येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गावनिहाय बैठका घेऊन अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन करताना दिसून येत आहेत. महायुती म्हणून सर्व सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना दिसून येत आहेत. काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रीय झालेल्या दिसून येत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुप्रिया सुळे, रोहित पवारांनी देखील सुनेत्रा वहिनींसाठी ताकद लावली आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार होते. परंतु त्यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला आहे. त्यांचा बारामती शहरात मर्यादित प्रभाव दिसून येतो.
बारामती तालुक्यातील धनगर समाज आणि मुस्लिम समाजाने सुनेत्रा वहिनींना पाठिंबा दिला आहे. सद्यस्थितीत बहुजन समाज पक्ष हा तटस्थ दिसून येत आहे.
बारामतीसंदर्भात पोल पंडितचे वरिष्ठ व्यवस्थापक अजिंक्य जवळेकर यांनी या निवडणुकीबाबतची ही निरक्षणं नोंदवली आहेत.
आता बारामतीत लीडवरुन चर्चा आहे. पार्थ पवारांसह अनेकांनी विक्रमी लीडवर फोकस केलेलं आहे. त्यामुळं त्यांच्यासमोर हे चॅलेंजच आहे. कारण मतदानादिवशी वाढत्या तापमानामुळे/उन्हामुळे मतदानाच्या टक्क्यात घसरण होऊ शकते. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविणे गरजेचे आहे.
एकूणच महायुतीसह महाविकास आघाडीनंही सुनेत्रा वहिनींसाठी जोर लावला आहे. अजितदादांच्या आठवणी सांगत, दादांचं कार्यकर्तृत्व सांगत हा प्रचार सुरु आहे आणि अर्थातच पुढचे अनेक वर्ष दादांनी करुन ठेवलेलं काम सुनेत्रा पवारांसाठी जमेची बाजू राहील. आता सुनेत्रा पवार वैयक्तिकरित्या यात कशी भर टाकतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.
आता 23 एप्रिल रोजी मतदान आणि चार मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळं आता बारामतीच्या निकालाकडे खासकरुन लीडकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
ADVERTISEMENT











