Rahuri Bypoll Survey: एक फोन किंगमेकर! पण राहुरीतली टशन संपलेली नाही, तसं झालं तर गेम फिरणार!
राहुरी पोटनिवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने येथे भाजपची वाट सोपी झाली असं वाटत असलं तरी स्थानिक पातळीवर चित्र मात्र पूर्णपणे वेगळं आहे.
ADVERTISEMENT

अहिल्यानगर: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये रंगत आली आहे. या निवडणुकीत भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिलेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) रिंगणात उतरणार असल्याची जोरात चर्चा झालेली मात्र भाजपने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला डाव टाकला आणि तनपुरेंनी अर्ज मागे घेतला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तनपुरेंच्या भेटीला पोहोचले. त्यांनी तिथून थेट देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. आणि एका फोन कॉलने प्राजक्त तनपुरे यांचे मन वळाल्याचे सांगितले गेलं. विकासकामांसाठी आणि समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार 100 टक्के मदत करेल, असे आश्वासन फडणवीसांनी तनपुरे यांना दिले गेल्याचं सांगितलं गेलं आणि राहुरीची पोटनिवडणूक लढवण्याचा विचार 180 अंशांच्या कोनात बदलली. मात्र निवडणुकीतली रंगत अजूनही कायम आहे.
आता इथं भाजपचे अक्षय कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे गोविंद मोकाटे, अपक्ष रावसाहेब खेवरे आणि वंचितचे संतोष चोळके यांच्यात मुख्य लढत होत आहे. आता तनपुरेंच्या माघारीनं इथलं गणित भाजपसाठी सोपं झालंय का? तर आजिबात नाही. मग इथं नक्की काय होणार, कर्डिलेंना कुणामुळं फटका बसू शकतो आणि निवडणूक कुणामुळं फिरु शकते यासंदर्भात पोलपंडित या सर्व्हे करणाऱ्या संस्थेनं तिथं फिरुन काढलेली काही महत्त्वाची निरीक्षणं आणि अंदाज आपण पाहूया.
राहुरी पोटनिवडणुकीतील प्रमुख उमेदवार:
- अक्षय कर्डिले - भाजप (BJP)
- गोविंद मोकाटे - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
- रावसाहेब खेवरे - अपक्ष (माजी शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख)
- संतोष चोळके - वंचित बहुजन आघाडी (VBA)
तर असं आहे की, अक्षय कर्डिले हे मतदारसंघातील अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर जिल्हा परिषद गटातून येतात. 2024 विधानसभेत दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांना अहिल्यानगर तालुक्यातून तब्बल 21,700 मतांची आघाडी मिळाली होती. 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला असताना देखील त्यांना अहिल्यानगर तालुक्यातून 15,175 इतके मताधिक्य होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांचा देखील तालुक्यात प्रभाव असून, त्यांनी कर्डिले यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. मात्र गोविंद मोकाटे देखील जेऊर गटातून येतात. अहिल्यानगर तालुक्यात त्यांचा सुद्धा जनसंपर्क आहे. त्यांच्या कन्या भाग्यश्री मोकाटे जेऊर जिल्हा परिषद गटाच्या सदस्य राहिलेल्या आहेत. यामुळे या निवडणुकीत मोकाटे हे कर्डिले यांना त्यांच्या होम पीचवर थेट आव्हान देणार आहेत.
हे ही वाचा>> बारामती अन् राहुरीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा, मतदान ते मतमोजणी प्रत्येक तारीख एका क्लिकवर
तिकडे पाथर्डी तालुक्यातील मीरी आणि तिसगाव जिल्हा परिषद गटांमध्ये कर्डिले यांना मतदारांचा पाठिंबा राहिला आहे. भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा कर्मचारी वर्ग, ऊस उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा गट या भागात सक्रीय असून त्यांचा अक्षय कर्डिले यांना पाठिंबा आहे. यामुळे या निवडणुकीत देखील पाथर्डी तालुक्यातील मतदारांचा कल भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्याकडे अधिक असण्याची शक्यता आहे.









