मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कार्यक्रमात मोठा बदल केला आहे. 26 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आलेले मूळ वेळापत्रक पूर्णपणे रद्द करून नवे सुधारित वेळापत्रक आज प्रसिद्ध करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
या सुधारित वेळापत्रकानुसार आता सर्व महत्त्वाच्या टप्प्यांच्या तारखा 5 ते 7 दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे उद्याच (10 डिसेंबर) प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी आता 15 डिसेंबरपर्यंत लांबली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने बदल केलेल्या तारखा
| क्र. | निवडणुकीचा टप्पा | 26/11/2025 च्या पत्रानुसार निर्धारित केलेला दिनांक | सुधारित दिनांक |
| 1. | प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणे | 10/1/2025 | 15/12/2025 |
| 2. | मतदान केद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे | 15/12/2025 | 20/12/2025 |
| 3. | मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे | 22/12/2025 | 27/12/2025 |
राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणात आलेले आक्षेप, तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी हा बदल करावा लागला. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, सोलापूर या मोठ्या महानगरपालिकांमध्ये आक्षेपांची संख्या प्रचंड असल्याने अतिरिक्त वेळेची गरज भासली.
या बदलामुळे प्रत्यक्ष मतदान तारखांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका नेमक्या कधी घेण्यात येतील याबाबत सध्या तर्क-वितर्क लढवले जात आहेत. मतदार यादीच्या या विलंबामुळे निवडणूक कार्यक्रम काही आठवडे पुढे जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
मतदारांना आवाहन
निवडणूक आयोगाने मतदारांना 15 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रभागनिहाय अंतिम याद्या नक्की तपासण्याचे आणि आपले नाव, पत्ता, वय आदी तपशील बरोबर असल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर 27 डिसेंबरला येणाऱ्या मतदान केंद्रनिहाय यादीतही नाव तपासावे, जेणेकरून मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येणार नाही.
या 29 महानगरपालिकांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, अकोला, कोल्हापूर आदींचा समावेश आहे. या निवडणुका राज्याच्या राजकारणातील दिशा ठरवणाऱ्या मानल्या जातात.
ADVERTISEMENT











