अनगर (सोलापूर): तब्बल 60 वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील अनगरची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा यंदा बाद होताहोता वाचली. कारण राजन पाटलांना चॅलेंज करत पोलीस प्रोटेक्शनमध्ये फिल्मीस्टाईल भरलेला उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाला. राजन पाटलांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि सूनबाई नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या. पण अनगरकर पाटलांच्या या वर्चस्वाला हादरा देण्याचं काम केलं दोन पाटलांनीच. एक उमेश पाटील आणि दुसऱ्या उज्ज्वला थिटे पाटील...
ADVERTISEMENT
एकहाती नगरपंचायत जिंकली आणि राजन पाटलांनी मिशीवर ताव मारला, दंड थोपटले तर बाळराजेंनी तर थेट अजितदादांना नाद न करण्याचं ओपन चॅलेंज दिलं. अर्थात दोघांनीही नंतर माफी मागितली. पण विषय अजून संपलेला नाही.
राजन पाटलांची दहशत, जंगलराज वगैरेच्या चर्चा सध्या मोक्कार होताना दिसताहेत. तसे आरोप उज्ज्वला थिटे आणि उमेश पाटील सतत करत आहेत. म्हणजे अगदी दोघे एकाच पक्षात होते तेव्हापासून.
अनगर निवडणुकीचा इतिहास अन् फ्लॅशबॅक
चला आता जाऊयात फ्लॅशबॅकमध्ये. अनगर हे माजी आमदार राजन पाटील यांचे मूळ गाव. मागील 60 वर्षांपासून ह्या गावाची ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे. पाटील फॅमिली म्हणजे पवारांची एकदम कट्टर. आता नुकतेच ते भाजपत आलेत.
हे ही वाचा>> भाजप नेत्याला भिडणारी रणरागिणी… उज्ज्वला थिटेंचा उमेदवारी अर्ज नेमका अचानक कसा झाला बाद?
मोहोळच्या राजकारणात राजन पाटलांना तसं तर कुणी तगडा प्रतिस्पर्धी मिळालाच नाही. राजन पाटील हाच पक्ष आणि ते सांगतील तीच पूर्वदिशा असंच चित्र. मात्र अलीकडेच त्यांच्याच कधीकाळी सोबत असलेल्या उमेश पाटलांनी त्यांना अंगावर घ्यायला सुरुवात केली. बरं दोघेही अजितदादांच्या राष्ट्रवादीत असताना यांच्यातली रायव्हलरी चर्चेत राहिली. दादांनीही कधी यात मध्यस्थीचा प्रयत्न केला नाही. राजन पाटील हे अनगरचे तर उमेश पाटील नरखेडचे. निवडणूक कुठलीही ही असली तरी या दोघांमध्येच खटके. आणि मग आता पाटलांच्या गावातच उमेश पाटलांनी नगरपंचायतीच्या निमित्तानं आव्हान देण्याचा प्रयत्न केला. सोबत घेतलं उज्ज्वला थिटे पाटलांना.
उज्वला थिटेंची राजकारणात एंट्री
उज्वला महादेव थिटे. 2000 साली अनगरच्या महादेव थिटे यांच्यासोबत लग्न झालं. उज्वला आणि महादेव यांना जयवंत नावाचा मुलगा . 2020 मध्ये महादेव थिटे यांचं निधन झालं. महादेव थिटे राजन पाटलांच्याच संस्थेत नोकरीला. 23 वर्षे अनगरमध्ये राहिल्यानंतर राजन पाटील आणि उज्वला थिटे यांच्या कुटुंबीयांचे कोणतेही वाद नव्हते. मात्र, 2023 साली पहिली ठिणगी पडली.
हे ही वाचा>> 'अजित पवार सगळ्यांचा नाद करा.. पण..', ज्यांच्या आशीर्वादाने पूर्ण हयात घालवली त्यांनाच बाळराजे पाटलांनी ललकारलं
शिवजयंतीची मिरवणूक होती, या मिरवणुकीत जयवंतला काही तरुणांनी खांद्यावर उचलून घेतलं. त्यावरून वाद झाले आणि जयवंतला मारहाण झाली, प्रकरण पोलिसांत गेले आणि जयंवतवर ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हाही नोंद झाला. आणि दाखल्यावर लाल शेरा आला. यानंतर आपण राजन पाटील यांची माफी देखील मागितल्याचा दावा उज्वला थिटेंनी केला.
हे प्रकरण चांगलंच गाजलं. पोलिसांत तक्रार झाली. घरावर दगडफेक, दरोडा, शेती करायला कुणी तयार होईना. थिटेंना मुलासह गाव सोडावं लागलं, असंही थिटे सांगतात.
उज्ज्वला थिटेंनी थेट राजन पाटलांवर हल्लाबोल केला. उमेश पाटलांनी पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरोधात ही संधी साधली आणि थिटेंना राजकीय मंच उपलब्ध करुन देत राजन पाटलांना घरातच चॅलेंज द्यायचा प्लॅन केला. नगरपंचायत निवडणुकीत पाटलांच्या सुनेच्या विरोधात उज्वला थिटेंना उमेदवारी दिली, एवढंच काय सगळा ड्रामा झाला आणि पोलीस संरक्षणात त्यांनी अर्ज दाखल केला.
उज्वला थिटे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पहाटे 5 वाजता पोलीस सरांक्षणात अनगर नगरपंचायत कार्यालयात पोहोचल्या. महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडलं असावं. याची चर्चा संपूर्ण राज्यात झाली. राजन पाटलांची बाहुबली टाईप प्रतिमा यामुळं निर्माण झाली. उज्ज्वला थिटेंनी तर भयंकर आरोपांची माळच लावली.
राजन पाटलांनी प्रत्येक आरोपांचं व्यवस्थितपणे उत्तर दिलं. लोकं काय म्हणतात बघा असं म्हणत राजन पाटील आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळतात.
मग थिटेंचा अर्ज बाद झाला. सूचकाची सही नव्हती म्हणून.. एवढं लढायची तयारी केली तर अर्ज दाखल करतानाच्या त्रुटी आधी का तपासल्या गेल्या नाहीत? हा सवालही आहेच. दंडेलशाही झुंडशाहीचा आरोप राजन पाटलांवर करणाऱ्या उमेश पाटील किंवा उज्ज्वला थिटेंनी या बाबी तपासल्या का नाहीत? त्यांना खरंच निवडणूक लढवायची होती का? असेही प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
आता प्रश्न येतो जंगलराजचा. तर थिटेंचा अर्ज बाद झाला आणि सेलिब्रेशन सुरु झालं. गुलाल उधळला आणि बाळराजेंनी थेट अजितदादांना दंड थोपटत आव्हान दिलं. कधी काळी ज्या दादांच्या पाया पडायचे त्या दादांना नाद करु नका असं बोललं गेलं. अर्थात ते अजितदादा आहेत हे लक्षात आल्यामुळं पाटील पिता-पुत्रांनी लगेच दिलगिरी व्यक्त केली. जे दादांना चॅलेंज देऊ शकतात त्यांच्यासमोर उज्ज्वला थिटे आणि उमेश पाटील कोण? हा ही प्रश्न आहेच.
आता राजन पाटलांच्या सूनबाई नगराध्यक्षपदाच्या खुर्चीत बसतील, गुलाल उधळला गेलाय. एक मात्र नक्की की उघडपणे पाटलांच्या विरोधात बोलणारं कुणीतरी तालुक्यात उभं राहिलंय हे खरं असलं तरी पाटलांनी ऑन रेकॉर्ड लोकशाही मार्गानं सत्ता आपल्याकडं टिकवून ठेवलीय हे नक्की. आता थिटेंचा अर्ज बाद झालाय, केलाय की करुन घेतलाय या प्रश्नांची उत्तरं भविष्यात मिळतील. मात्र आता खऱ्या अर्थाने पिक्चर सुरु झालाय, हा पूर्वार्ध आहे, उत्तरार्ध कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT











