भाजपचं पुन्हा धक्कातंत्र.. विधान परिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर, 'यांना' दिली संधी

ऋत्विक भालेकर

• 09:39 PM • 28 Apr 2026

BJP MLC Candidate: भाजपने महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. पाहा नेमकी कोणाला संधी मिळाली.

bjp springs another surprise 5 candidates announced for mharashtra legislative council elections opportunity given to loyal party workers

BJP MLC Candidate list

Google CTA

मुंबई: भारतीय जनता पार्टी (BJP) ने महाराष्ट्र विधान परिषदेच्या (MLC)आगामी निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या उमेदवारांमध्ये पक्षातील अनुभवी कार्यकर्ते, संघटनात्मक नेते, सामाजिक प्रतिनिधित्व आणि सहकार क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींचा समावेश आहे. पण यावेळी महाराष्ट्रातील भाजपने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

हे वाचलं का?

भाजपकडून तब्बल 20 ते 25 नावं ही चर्चेत होती. ज्यापैकी काही नावं ही राज्यातील भाजप नेतृत्वाने केंद्रीय भाजपच्या समितीकडे पाठवली होती. ज्यापैकी 5 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पण ही नावं निश्चित करताना भाजप नेतृत्वाने धक्कातंत्राचा वापर केला आहे. यावेळी भाजपने पक्षातील तळागाळातील लोकांना संधी दिली आहे.

भाजपने जाहीर केलेले विधान परिषदेचे उमेदवार

1. सुनील कर्जतकर: भाजपचे संघटन मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावान कार्यकर्ते. दीर्घकाळ पक्षासाठी काम केलेल्या कर्जतकर यांना संघटनात्मक अनुभव आणि पक्षातील मजबूत पाठबळ आहे.

2. माधवी नाईक (ठाणे): भाजपच्या महामंत्री. अनुसूचित जाती (SC) समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माधवी नाईक यांचा समावेश महिला आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

3. संजय भेंडे (नागपूर): नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेडचे अध्यक्ष. 2013 पासून भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करणारे भेंडे यांचा सहकार क्षेत्रात चांगला अनुभव आहे. नागपूर विभागात त्यांचा प्रभावी वाटा आहे.

4. विवेक कोल्हे (अहिल्यानगर - कोपरगाव): भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू. कुटुंबीयांची राजकीय आणि सहकार क्षेत्रातील पार्श्वभूमी लक्षात घेता विवेक कोल्हे यांना पक्षाने संधी दिली आहे.

5. प्रमोद जठार: कोकणातील कणकवली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार. कोकण विभागातील अनुभवी नेते म्हणून जठार यांचा पक्षाला फायदा होण्याची अपेक्षा आहे.

हे ही वाचा>> विधान परिषद निवडणूक: भाजपने हायकमांडकडे पाठवली 'ही' नावं, आमदारकीची लॉटरी नेमकी कोणाला?

या उमेदवारांच्या निवडीत भाजपने संतुलित दृष्टिकोन ठेवल्याचे दिसते. एकीकडे संघटनात्मक निष्ठा (सुनील कर्जतकर), सामाजिक प्रतिनिधित्व (माधवी नाईक), सहकार क्षेत्रातील अनुभव (संजय भेंडे व विवेक कोल्हे) आणि स्थानिक प्रभाव (प्रमोद जठार) यांचा समावेश करण्यात आला आहे. 

राज्य भाजपने या नावांची शिफारस केंद्रिय नेतृत्वाकडे केली होती, केंद्रीय स्तरावर अंतिम मंजुरीनंतर अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी ही निवडणूक होणार आहेत.