तरुणी व्यायामासाठी मित्रांसोबत बाहेर पडली, पण जीर्ण इमारतीत नेऊन अत्याचार

मुंबई तक

• 10:51 AM • 04 Oct 2026

Crime News : फरिदाबादमध्ये 13 वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.

Crime News

Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

तरुणी व्यायामासाठी मित्रांसोबत बाहेर पडली

point

पण जीर्ण इमारतीत नेऊन अत्याचार

Crime News : फरिदाबादमध्ये 13 वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. मुलगी आपल्या 16 वर्षीय मित्रासोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती. यावेळी तीन तरुणांनी दोघांना एका जीर्ण आणि निर्जन इमारतीत नेल्याचा आरोप आहे. तिथे मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला, तर तिच्या मित्रावरही लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कुनाल, यश आणि दीपक या तिघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आणखी एक आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'को-पायलट नमाजासाठी उठला अन् पाठीमागून...', कॅप्टन स्मितने सांगितलं कॉकपिटमध्ये काय घडलं

तीन जणांना अटक, संशयितांचा शोध सुरु 

ही घटना 24 ऑगस्ट रोजी घडल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुलगी आणि तिचा मित्र फिरण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी आरोपींनी दोघांना एका पडझड झालेल्या इमारतीत नेले आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेत तीन जणांना अटक झाली असली तरी आरोपींची संख्या आणखी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघे परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. त्यांची भूमिका आणि इतर संशयितांचा सहभाग याबाबत तपास सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची आणखी चौकशी

या प्रकरणाचा तपास फरिदाबादमधील बीपीटीपी पोलीस ठाण्याकडून केला जात आहे. तपास पथकाकडून घटनेशी संबंधित सर्व बाबींची चौकशी केली जात असून, पोलीस कोठडीदरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींची आणखी चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, अत्याचार सुरू असताना मुलगी आणि तिचा मित्र तब्बल दीड तास मदतीसाठी आरडाओरड करत होते, अशी माहिती समोर आली आहे. दोघांनी मदतीसाठी आवाज दिला. मात्र, ही इमारत निर्जन परिसरात असल्याने त्यांच्या मदतीला कोणीही आले नसल्याचे सांगितले जात आहे.

फरिदाबादमधील या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरातील महिला आणि अल्पवयीनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. 21 सप्टेंबर रोजी दिल्लीतील कालकाजी परिसरातील आस्था कुंज पार्कमध्ये 17 वर्षीय मुलीवर तीन जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. आरोपींनी स्वतःला पोलीस कर्मचारी असल्याचे सांगून मुलीला तिच्या मित्रापासून वेगळे केले आणि पार्कमधील निर्जन ठिकाणी नेल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले होते. या घटनेनंतर दिल्लीचे नायब राज्यपाल तारणजीत सिंह संधू यांनी राजधानीतील उद्यानांचे सुरक्षा परीक्षण करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये प्रकाश व्यवस्था, सुरक्षा आणि नियमित गस्त यावर भर देण्यात आला. दिल्ली पोलिसांनाही उद्यान परिसरातील सुरक्षा मजबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांनंतर 28 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानेही सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. न्यायालयाने 2012 मधील निर्भया प्रकरणाचा संदर्भ देत सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज अधोरेखित केली होती.