'को-पायलट नमाजासाठी उठला अन् पाठीमागून...', कॅप्टन स्मितने सांगितलं कॉकपिटमध्ये काय घडलं

मुंबई तक

04 Oct 2026 (अपडेटेड: 04 Oct 2026, 10:13 AM)

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या विमानात सहवैमानिकाने केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी गंभीर जखमी अवस्थेतही धैर्याने मुकाबला केला. त्यांच्या प्रसंगावधानामुळे आणि प्रवासी व इतर वैमानिकांच्या मदतीमुळे 174 प्रवाशांचे प्राण वाचले.

flydubai co pilot offering namaz  pilot smit machchhar saves 174 passengers copilot attack with axe in cockpit

फाइल फोटो

Google CTA

सौदी अरब: दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या FZ1073 या विमानात 30 सप्टेंबर रोजी एक धक्कादायक घटना घडली. विमानातील ओमानी सहवैमानिकाने भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर कॉकपिटमध्ये हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही स्मित यांनी हार मानली नाही. त्यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे विमानातील 174 प्रवाशांचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 

हे वाचलं का?

नमाजाच्या बहाण्याने सहवैमानिक उठला अन् केला हल्ला 

कॅप्टन स्मित मच्छार यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी झालेल्या फोनवरील संवादात या घटनेचा थरारक घटनाक्रम सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'विमानाचा प्रवास सुरळीत सुरू असताना सहवैमानिक नमाज पठणासाठी उठला. त्यावेळी मी आदर म्हणून मागे तोंड वळवले नाही. तो पुढेच पाहत राहिला.'

'पण काही मिनिटांनंतर त्याने माझ्या डोक्याच्या मागील बाजूस जोरदार प्रहार केला. सुरुवातीला विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा, असे मला वाटले. मात्र, एकापाठोपाठ एक प्रहार होत राहिल्यानंतर सह-वैमानिकच आपल्यावर हल्ला करत असल्याचे माझ्या लक्षात आले.'

हे ही वाचा>> 'माझ्यावर वार होत होते पण...', भारताचा ढाण्या वाघ कॅप्टन स्मितने PM मोदींना Video Call वर सांगितला सगळा थरार!

'सहवैमानिकाने आपत्कालीन वापरासाठी ठेवलेल्या कुऱ्हाडीने हल्ला केल्याचं त्यावेळी समजलं. सुरुवातीला या हल्ल्यामुळे माझ्या डोळ्यासमोर अक्षरश: अंधार पसरला होता. पहिले काही क्षण नेमकं काय घडतंय हेच मला समजलं नाही.' असं स्मितने नेत्यानाहू यांना सांगितलं.  

विमान वेगाने खाली येऊ लागलेलं म्हणून केला शेवटचा प्रयत्न

स्मितने नेत्यानाहू यांना पुढे सांगितले की, 'हल्ल्यादरम्यान विमानाची उंची झपाट्याने कमी होऊ लागली होती. कॉकपिटमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना बाहेर असलेल्या प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहवैमानिक त्यांना आत येण्यापासून रोखत होता.'

'मी जखमी अवस्थेत कॉकपिटचा दरवाजा उघडण्याचा पहिला प्रयत्न केला. मात्र, सहवैमानिकाने दरवाजा पुन्हा बंद केला आणि त्यानंतर मी खाली कोसळलो.' असं स्मितने यावेळी सांगितलं.

हे ही वाचा>> कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्यामुळे 180 प्रवाशांचे प्राण कसे वाचले? कसं आहे मुंबई कनेक्शन?

अशा परिस्थितीत कोणाचाही धीर सुटला असता. मात्र, स्मितने आणखी एक प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. गंभीर वेदना होत असतानाही त्याने स्वतःला सावरले आणि दरवाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

‘माझ्याकडे लढण्यासाठी आणखी एक शेवटची संधी होती,’ असं म्हणत स्मितने नेतान्याहू यांच्याशी संवाद साधताना त्या क्षणाचे वर्णन केले. अखेर त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि बाहेर थांबलेल्या प्रवाशांना आत प्रवेश करण्याची संधी मिळाली.

प्रवासी आणि वैमानिकांनी परिस्थिती नियंत्रणात आणली

दरवाजा उघडल्यानंतर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी कॉकपिटमध्ये प्रवेश करून हल्लेखोर सहवैमानिकाला ताब्यात घेण्यास मदत केली. विमानात प्रवासी म्हणून प्रवास करणारे अन्य दोन फ्लाय दुबई वैमानिकही मदतीला धावले. या वैमानिकांनी विमानाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर विमानाचे सौदी अरेबियातील तबूक येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेत विमानातील 174 प्रवाशांचे प्राण वाचले.

स्मित मच्छार यांच्या धैर्याचे जगभरातून कौतुक

या घटनेनंतर भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धैर्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी परिस्थितीचा सामना केला आणि इतरांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही त्यांच्या शौर्याचे कौतुक केले. संकटाच्या क्षणी दाखवलेले धैर्य, प्रसंगावधान आणि इतरांच्या जीवाची घेतलेली काळजी यामुळे स्मित मच्छार यांची कहाणी चर्चेत आली आहे.

विमानातील सहवैमानिकाकडूनच हल्ला झाल्याने या घटनेने विमान सुरक्षेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, एका भारतीय वैमानिकाने स्वतः गंभीर जखमी असतानाही हार न मानता 174 प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी केलेला संघर्ष निश्चितच थरारक आहे.