बंटी पाटलांना कोंडीत पकडण्याचा फडणवीसांचा प्लॅन? पुणे पदवीधर निवडणुकीत स्मिता जाधवांच्या एन्ट्रीची इनसाईड स्टोरी!

मुंबई तक

• 07:00 AM • 06 Oct 2026

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपने डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी देत मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण केला असून त्यांच्या उमेदवारीमागे देवेंद्र फडणवीसांची नेमकी रणनीती काय आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

devendra fadnavis smita jadhav pune graduate constituency satej patil political strategy

निवडणुकीत स्मिता जाधवांच्या एन्ट्रीची इनसाईड स्टोरी!

Google CTA

पुणे: देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या सगळ्या मातब्बर इच्छुकांना डावलून नवख्या महिलेला पुणे पदवीधरची उमेदवारी दिलीय. आणि तीही फडणवीसांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या भाचीला ऐनवेळी रिंगणात उतरवलंय. पिंपरी इथल्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. स्मिता योगेश जाधव यांना पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिलीय. हेच फडणवीसांचं धक्कातंत्र मानलं जातंय, तर दुसरीकडे हा बंटी पाटलांना धर्मसंकटात टाकण्याचा मास्टरस्ट्रोक असल्याचंही म्हटलं जातंय. धक्कातंत्र आहे, मास्टरस्ट्रोक आहे की निष्ठावंतांना डावलण्याचा नवा पॅटर्न आहे? फडणवीसांनी बंटी पाटलांच्या सख्या भाचीला म्हणजेच डॉ. स्मिता योगेश जाधव यांना विधान परिषदेच्या रिंगणात का उतरवलं? याचंच विश्लेषण या व्हिडिओत करणार आहोत. 

हे वाचलं का?

सुरुवातीलाच आपण पदवीधर मतदारसंघाचं राजकारण समजून घेऊ. विधान परिषदेच्या शिक्षण आणि पदवीधर मतदारसंघातल्या पाच जागांसाठी निवडणूक लागलीय. २३ ऑक्टोबरला या निवडणुकीसाठी मतदान आहे. तत्पुर्वी, ६ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत मोठ्या उलथापालथी बघायला मिळत आहेत. अनेक ट्विस्ट निर्माण झालेत. महायुतीत जागावाटपावरून बंडाळी सुरू असतानाच भाजपने ३ जागांवर उमेदवार जाहीर केलेत. रविवार, ४ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या यादीत नागपूर पदवीधरमधून माजी आमदार सुधाकर कोहळे, पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे आणि पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. साधं पक्षाचं सदस्यत्वही नसलेल्या डॉ. स्मिता योगेश जाधव यांना तिकीट दिल्याने अनेकांना बुचकळ्यात टाकलंय.

त्यातच पुणे पदवीधर मतदारसंघ हा ऐतिहासिकदृष्ट्या भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सलग तीन वेळा आणि राज्याचे विद्यमान मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सलग दोन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. मात्र, २०२० च्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या लाटेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांनी भाजपचा मानहानीकारक पराभव केला होता. हाच गमावलेला गड पुन्हा जिंकण्यासाठी भाजपने आधीपासूनच तयारी सुरू केली होती. अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसंच राजेश पांडे यांना तर खास या पदवीधर नोंदणी मोहिमेचं नेतृत्व देण्यात आलं होतं. तसंच राष्ट्रवादीकडून मंत्री हसन मुश्रीफांचे डावे-उजवे हात म्हणून ओळखले जाणारे भैय्या मानेही इच्छूक होते. 

विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा असतानाही भाजपने महायुतीच्या जागावाटपात ही सीट स्वतःकडे ठेवून घेतली. डॉ. स्मिता जाधव यांच्या रूपाने नवखा, उच्च शिक्षित आणि राजकीय वारसा असलेला चेहरा भाजपने दिलाय. खासदार धनंजय महाडिक यांच्या मते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्मिता जाधवांना उमेदवारी देऊन मास्टरस्ट्रोक मारलाय. पण हा नेमका मास्टर स्ट्रोक काय, हे समजून घेण्याआधी आपम स्मिता जाधव कोण आहेत, त्यांचा राजकीय वारसा काय, हे समजून घेऊ.

कोण आहेत डॉ. स्मिता योगेश जाधव?

डॉ. स्मिता जाधव या उच्चविद्याविभूषित आणि राजकीय वारसा असलेल्या कुटुंबातून येतात. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून B.E. (Computer Engineering), वित्तीय व्यवस्थापनात MBA (Financial Management) आणि शिक्षणशास्त्र विषयात Ph.D. पूर्ण केलीय. याशिवाय ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी नेतृत्व विकासाचं विशेष प्रशिक्षण घेतलंय. सध्या त्या पिंपरी इथल्या नामांकित डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू आणि विद्यापीठ सोसायटीच्या सचिव म्हणून जबाबदारी सांभाळतात. हे झालं, त्यांचं एज्युकेशनल करिअर. 

त्यांच्या या एज्युकेशनल करिअरची सुरुवात ही त्यांच्या कुटुंबाच्या पॉलिटिकल करिअरमधून झालीय. डॉ. स्मिता जाधव या कोल्हापूरच्या दैनिक 'पुढारी'चे संस्थापक पत्रमहर्षी डॉ. ग. गो. जाधव यांच्या नातसून आहेत. ग. गो. जाधव हे आणि १९४९ मध्ये तत्कालीन मुंबई प्रांताच्या असेंब्लीवर कोल्हापूरचे पहिले आमदार म्हणून निवडून गेले होते. तसंच त्या पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सून आणि 'पुढारी'चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या पत्नी आहेत. ही झाली सासरची ओळख.

माहेरची ओळख सांगायचं झालं, तर त्या बिहारचे माजी राज्यपाल, दिवंगत डॉ. डी. वाय. पाटील यांची नात आणि डॉ. पी. डी. पाटील यांच्या कन्या आहेत. काँग्रेसचे विधान परिषदेतले नेते, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या त्या सख्या भाची आहेत. डी. वाय पाटील विद्यापीठ ही पाटील कुटुंबाचीच शिक्षण संस्था आहे. या परिचयामध्येच मुख्यमंत्री फडणवीसांनी स्मिता जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची ५ कारणं दडलेली आहेत.

इच्छुकांना डावलून स्मिता जाधवांना तिकीट का?

१. कोल्हापूर कनेक्शन

पुणे पदवीधर मतदारसंघात पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या निगराणीती ही निवडणूक प्रक्रिया पार पडते. या निवडणुकीसाठी ५ जिल्ह्यांमध्ये एकूण ३,१०,९६४ पदवीधर मतदार नोंदणीकृत आहेत. आणि या मतदारांचं कोल्हापूर कनेक्शन हे डॉ. स्मिता जाधवांना उमेदवारी मिळण्यामागचं प्रमुख कारण आहे. कारण, कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मतदार आहेत. 

जिल्हावार आकडेवारी बघितली तर, त्यात,

कोल्हापूर: ९१,४०० मतदार
सांगली: ७८,३६६ मतदार
पुणे: ६१,११३ मतदार
सातारा: ४२,०६३ मतदार
सोलापूर: ३८,०२२ मतदार

या ५ जिल्ह्यांत एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ९१ हजारांपेक्षा जास्त पदवीधर मतदार आहेत. त्यामुळे कोल्हापूरचा स्थानिक आणि प्रभावशाली चेहरा रिंगणात उतरवणं भाजपसाठी संख्याबळाच्या दृष्टीने गरजेचं होतं. राजेश पांडे हे पुण्याचे, तर शरद लाड हे सातारचे आहेत. त्यामुळेच फडणवीसांनी कोल्हापूर कनेक्शनला प्राधान्य दिल्याचं म्हटलं जातंय.

२. सतेज पाटलांची राजकीय कोंडी

सतेज (बंटी) पाटील हे काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातले बडे नेते म्हणून ओळखले जातात. गोकुळची निवडणूक असो की जिल्हा बँकेची ते संपूर्ण महाविकास आघाडीचे तंबू एकहाती सांभाळत आहेत. त्यामुळे पदवीधरच्या निवडणुकीतही बंटी पाटलांनी मविआसाठी ताकद लावली होती. त्याचवेळी फडणवीसांनी सख्या भाचीला रिंगणात उतरवून बंटी पाटलांना धर्मसंकटात टाकलंय.

सतेज पाटलांनी ‘घर फोडणं हा भाजपचा अजेंडा आहे, मी महाविकास आघाडीच्याच उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करणार’ अशी जाहीर भूमिका घेतलीय. पण या उमेदवारीमुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आणि राजकीय पेच निर्माण केलाय, हे मात्र खरं.

३. पक्षांतर्गत गटबाजीवरचा न्यूट्रल तोडगा

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांतल्या स्थानिक नेत्यांमध्ये तीव्र स्पर्धा होती. शरद लाड किंवा भाजपच्या पारंपरिक नेत्यांपैकी एकाला उमेदवारी दिली असती, तर पक्षांतर्गत बंडखोरी उफाळून येण्याची भीती होती. डॉ. स्मिता जाधव यांच्या रूपाने कोणत्याही राजकीय गटाचा शिक्का नसलेला, उच्चशिक्षित आणि अ-राजकीय संस्थात्मक चेहरा मिळाल्याने पक्षातल्या गटबाजीला पूर्णविराम मिळाला.

४. संस्थात्मक जाळं

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असो की शिक्षक मतदारसंघाची तिथं तुमचं नेटवर्क कामाला येतं. मतदारांची नोंदणी, त्यांच्यासोबतचा कनेक्ट तुम्हाला जिंकवून देऊ शकतो. त्यामुळेच भाजपने पदवीधर मतदारसंघात D.Y. पाटील समूह आणि पुढारी माध्यम समूह अशी मोठी संस्थात्मक ताकद पाठिशी असलेल्या डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवार दिलीय. D.Y. पाटील विद्यापीठातल्या २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांचं जाळं, पुढारीचा जनसंपर्क एकत्र आल्यामुळे महायुतीला मोठी ताकद मिळणार आहे.

५. उच्चविद्याविभूषित 'महिला कार्ड'

पदवीधर मतदारसंघातला मतदार हा सुशिक्षित आणि विचारपूर्वक मतदान करणारा म्हणून ओळखला जातो. B.E., MBA आणि Ph.D. अशी भक्कम शैक्षणिक पात्रता असलेला चेहरा मतदारांसमोर जाताना आकर्षक ठरू शकतो. तसंच ३३% महिला आरक्षण धोरणाशी सुसंगत असं हे 'सोशल इंजिनिअरिंग' मानलं जातंय.

पण विजयाचं गणित इतकं सोप्पं आहे का?

या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा देशमुख (जाधव) यांना उमेदवारी दिलीय. देशमुखही उच्चविद्याविभूषित आहेत. त्यामुळे ही निवडणूक दोन उच्चविद्याविभूषित आणि प्रशासकीय-राजकीय पार्श्वभूमी असलेल्या महिला नेत्यांमधली अटीतटीची लढत ठरणार आहे. स्मिता जाधव यांच्यामागे डी वाय पाटील समुहाची ताकद असणार आहे, तर हर्षदा देशमुख यांच्यामागे शरद पवारांचं संस्थात्मक जाळं असणार आहे. हर्षदा यांनी आधीपासूनच तयारी सुरू केलीय. त्यामुळे स्मिता जाधव या मतदारांसाठी नवख्या आहेत, तर हर्षदा देशमुखांच्या प्रचाराच्या एक-दोन फेऱ्या पूर्ण झाल्यात. पण फडणवीसांचा हा 'कोल्हापूर मास्टरस्ट्रोक' २०२० च्या पराभवाचा वचपा काढणार ठरेल की इच्छुकांना डावलणं भाजपला महाग पडेल, हे येणारा काळच ठरवेल. २३ ऑक्टोबरच्या मतदानानंतर २७ ऑक्टोबरला जेव्हा मतमोजणी सुरू होईल, तेव्हाच नेमका कौल कळेल, पण फडणवीसांनी या निवडणुकीत स्मिता जाधवांना तिकीट देऊन ट्विस्ट निर्माण केलाय, हे मात्र खरं.